सोलापुरवर जलसंकट कोसळणार ? पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:06 IST2018-11-22T14:03:39+5:302018-11-22T14:06:24+5:30
सोलापूर : महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले असून, आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट ...

सोलापुरवर जलसंकट कोसळणार ? पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप जळाले
सोलापूर: महापालिकेच्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील सहा पंपांपैकी दोन विद्युतपंप जळाले असून, आता तिसरा पंप जळाल्यास सोलापूरवर पुन्हा जलसंकट कोसळण्याची शक्यता आहे.
उजनी जलवाहिनीवरून येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. उजनी पंपगृहातून पंपिंग केलेले पाणी चिखली टॉवरजवळील बीपीटीपर्यंत आणले जाते. बीपीटीतून दाबाने पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी कोंडी एमबीआरपर्यंत (उंचावरील टाकी) पोहोचविण्यासाठी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रात चार पंप सुरू ठेवावे लागतात.
आपत्कालीन परिस्थितीत चार पंप कायम सुरू राहण्यासाठी या ठिकाणी दोन स्टॅडिंग पंप ठेवण्यात आले आहेत. पंप सतत सुरू राहिल्याने व विजेच्या कमी-जास्त दाबाने जळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक बारा तासाला एका पंपाला विश्रांती देऊन स्टॅडिंगमधील पंप चालविला जातो. शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी चार पंप कायम सुरू राहणे गरजेचे आहे.
तीन आठवड्यांपूर्वी या केंद्रातील दोन पंप जळाले आहेत. त्यामुळे सध्या चार पंप सतत सुरू आहेत. यातील एक पंप जर नादुरूस्त झाला तर शहरावर पुन्हा जलसंकट कोसळणार अशी स्थिती आहे. तीन पंपांवर पाणी उपसा झाला तर शहराला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. हिप्परगा तलावातील पाणी बंद झाल्याने भवानीपेठेला २२ दशलक्ष लिटर पाणी उजनी जलवाहिनीवरून दिले जात आहे. त्यामुळे या स्थितीत पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातील या स्थितीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
दुरूस्ती अडकली टेंडरमध्ये
- जळालेले दोन्ही पंप संबंधित मेकॅनिककडे पोहोच करण्यात आले आहेत. सध्या स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे विनाटेंडर दुरूस्तीच्या खर्चाला सभेची मान्यता घ्यावी लागते. ही मान्यता अडकल्याने मेकॅनिकने पंप दुरूस्तीचे काम हाती घेतलेले नाही ही वस्तुस्थिती असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात आले़