सोलापुरातील सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:33 PM2021-02-02T17:33:20+5:302021-02-02T17:33:25+5:30

प्रेक्षकांची संख्या कमीच : केंद्राची परवानगी; पण राज्य सरकारचे निर्देश नाहीत

Waiting for government order to start cinema at full capacity in Solapur | सोलापुरातील सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन आदेशाची प्रतीक्षा

सोलापुरातील सिनेमागृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन आदेशाची प्रतीक्षा

Next

सोलापूर : केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृह शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. आता चित्रपटगृह चालकांना महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर चित्रपटगृह हे पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक व्यवसायांपुढे अडचणी आल्या. सरकारने हळूहळू नियमात शिथिलता आणून स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, मनोरंजन क्षेत्रासाठीचे नियम सर्वात उशिरा शिथील करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यामध्ये पन्नास टक्के प्रवेश क्षमतेला परवानगी देऊन चित्रपटगृह सुरू करण्य़ास मान्यता दिली होती. आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गेल्यानंतर शंभर टक्के प्रवेश क्षमतेस मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून चित्रपटगृहांसाठीचा शंभर टक्के प्रवेश क्षमतेबाबतचा आदेश व नियमावली अद्याप आलेली नाही. त्यामुळे स्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यात चित्रपटगृह सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर शहरातील मोजकीच चित्रपटगृह सुरू झाली आहेत. बहुतांश चित्रपटगृह ही सोमवार १ फेब्रुवारी रोजीही बंद असल्याचे दिसून आले. मुख्य शहरातील दोन तसेच पूर्व भागातील दोन चित्रपटगृह सुरू होती. सरकारने मान्यता दिली असली तरीही प्रेक्षक चित्रपटगृहात खूप कमी संख्येने येत असल्याचे दिसून आले.

नव्या चित्रपटांवर आशा

नवे चित्रपट प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे पूर्वीप्रमाणे वळतील, अशी आशा चित्रपटगृह चालकांना आहे. सध्या काही वर्षांपूर्वीचे चित्रपट दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या चित्रपटास खूप कमी प्रतिसाद मिळत आहे.

 

येत्या दोन दिवसात राज्य सरकारकडून चित्रपटगृहात शंभर टक्के क्षमतेसाठीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या आम्ही चित्रपट दाखवत असलो तरी प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद आहे. आता लसीकरणाला सुरुवात झाली असून, एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थितीत नक्कीच सुधारणा होईल.

- देविदास गुंडेटी, चित्रपटगृह संचालक

चित्रपटगृहात प्रेक्षकांना प्रवेश देताना त्यांच्या आरोग्याविषयी सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी न घाबरता मास्क वापरून चित्रपटगृहात यावे. चित्रपटगृह व्यवस्थित चालण्यासाठी सरकारने कमीत कमी एक वर्ष तरी कर माफ करावा. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान पाहून सरकारने चित्रपटगृहांसाठी आर्थिक मदत द्यावी.

- मंदार नागणे, चित्रपटगृह व्यवस्थापक

Web Title: Waiting for government order to start cinema at full capacity in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.