लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 21:07 IST2025-08-23T21:04:02+5:302025-08-23T21:07:03+5:30
दरम्यान रात्री ९ वा सुमारास चिंचगाव (ता. माढा) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले. कुईवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनॉलजवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला.

लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
कुर्डूवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पिंपळनेर (ता. माढा) हद्दीतील कॅनोलमध्ये जाऊन पलटी झाली. या अपघातात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास झाला.
शंकर उत्तम बंडगर (वय ४४), अनिल हनुमंत जगताप (वय ५५, दोघे रा. वडापुरी, ता. इंदापूर जि. पुणे), अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादी सुरेश राजाराम जाधव (वय ४९) हा जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर बंडगर यांच्या मुलाला मुलीचे स्थळ पाहण्यासाठी गुरुवारी गावातील अनिल हनुमंत जगताप व फिर्यादी सुरेश राजाराम जाधव हे तिघे एका कार (एम.एच. ४२/ बी.ई. ८९५४) मधून धाराशीव येथे गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकून सायं ७वाजता वडापुरीकडे निघाले.
दरम्यान रात्री ९ वा सुमारास चिंचगाव (ता. माढा) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले. कुईवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनॉलजवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला. कार रस्त्याच्या कडेला लोखंडी गार्डला घासत कॅनॉलमध्ये जाऊन पलटी झाली.
चालकाच्या बाजूला बसलेले फिर्यादी सुरेश जाधव यांच्याही नाका तोंडात पाणी गेले. ते बाजूचा दरवाजा उघडून पाण्यातून बाहेर आले. फिर्यादी गाडीवर चढून रस्त्यावरून जाणाऱ्यांना ओरडून मदत मागितली. जमलेले काही लोक आणि हॉटेलमधील कामगार मदतीला धावले. त्यांनी फिर्यादीला बाहेर काढले.
ट्रॅक्टरच्या मदतीने गाडी कॅनॉलमधून काढली
यावेळी पिंपळनेर पोलिस पाटील राहुल पेटकर, ढवळसचे पोलिस पाटील ज्योतीराम इंगळे व सोमनाथ डांगे यांचा ट्रॅक्टर बोलावून घेतले. ट्रॅक्टरला दोरी लावून कार बाहेर - ओढून काढली. त्यानंतर लॉक झालेले दोन्ही दरवाजे तोडून त्या दोघांना बाहेर काढले. खासगी रुग्णवाहिकेने कुडूवाडीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता - उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाक्टरांनी सांगितले.