एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर शरद पवारांचे दोन आमदार, उपस्थितीची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:25 IST2025-11-24T16:24:59+5:302025-11-24T16:25:34+5:30
Solapur News: नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. रविवारी अक्कलकोट, मोहोळ, सांगोला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या.

एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर शरद पवारांचे दोन आमदार, उपस्थितीची रंगली चर्चा
Solapur Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. काहीजणांनी शिंदेसेनेत प्रवेश केला, तर इतर पक्षांचे आमदारही शिंदे यांच्या व्यासपीठावर होते. मोहोळचे आमदार राजू खरे हेही नेहमीप्रमाणे शिंदेंसोबत दिसले. सांगोल्यातील सभेत मात्र शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर प्रथमच शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसले. त्यांच्या उपस्थितीची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. रविवारी अक्कलकोट, मोहोळ, सांगोला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या. तिन्ही ठिकाणी भाजपच्या विरोधात भाषणे झाली.
मोहोळच्या सभेत शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे व्यासपीठावर होते. मागील काही दिवसांपासून ते प्रचारात लांब राहिले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी शरद पवार गट स्वतंत्रपणे लढत आहे. नगराध्यक्षासाठी रिंगणात आहेत. मात्र, खरे हे शिंदेसेनेसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आबासाहेबांची निष्ठा घालवली, राग आल्याने मी प्रचारात : जानकर
स्व. आबासाहेबांनी गेली ५५ वर्षे निष्ठा, तत्वे, स्वाभिमान सांभाळला. तो ५५ दिवसात घालवला, याचा मला राग आला म्हणून मी आज आलोय. गेल्या निवडणुकीत मी विमानातून कशीतरी उडी घेतली म्हणून मी वाचलो, बापू तुम्ही विमानात गेलात आणि तुमचाही (भाजपने) करेक्ट कार्यक्रम केल्याचे आमदार उत्तम जानकर म्हणाले.
सध्या उत्तम जानकर पालकमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याच विचारातून सांगोला येथे सभेला ते उपस्थित राहिले असतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली.
शहाजीबापूंना उत्तमरावांची मिळाली साथ..
सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांना एकटे पाडल्याचे बोलले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या सभेला शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची उपस्थिती होती. त्यामुळे शहाजीबापुंना आता उत्तमरावांची साथ मिळाल्याची चर्चा सुरू होती.
एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये उत्तम जानकरांचा उल्लेख करत आता शहाजीबापू एकटे नाहीत, त्यांना जानकरांची साथ असल्याचे बोलले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील दोन आमदारांच्या भेटीची चर्चा मात्र रंगली होती.
"मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. माझ्या विरोधात काम करणाऱ्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणानुसार निर्णय घेतला", असे आमदार राजू खरे म्हणाले.