यावलीजवळील अपघातात दोन गॅस कामगारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:35 IST2019-07-18T14:33:35+5:302019-07-18T14:35:01+5:30
कार-मोटरसायकल अपघात; एक जखमी, तिघेही गॅस गोडावूनमधील कामगार

यावलीजवळील अपघातात दोन गॅस कामगारांचा मृत्यू
मोहोळ : दुचाकी मोटरसायकलवरून मोहोळहून यावलीकडे निघालेल्या तिघांना पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हे तिघेजण मोहोळ येथील इंडियन गॅस गोडावूनमध्ये काम करत होते.
हा अपघात बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान यावली पाटीजवळ घडला़ या अपघातानंतर मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली़ एम़ एच़ १३, सी. झेड ६९१६ या दुचाकीवरून सागर दत्तात्रय सलगर (वय २१, नागनाथ गल्ली), अक्षय रमेश मस्के (वय २१, न्यू समर्थ नगर) आणि करण धर्मराज धुंबड हे तिघे जण यावलीला नातेवाईकांकडे निघाले होते. दरम्यान, ८़३० वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या इनोव्हा (एम़ एच़ ४३ / ए़ ५४५४) कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील सागर सलगर व अक्षय मस्के हे दोघेजण जागीच मरण पावले़ तर करण धुंबड हा गंभीर जखमी झाला़ या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ तिघांपैकी सागर आणि अक्षयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ञांनी जाहीर केले.
या अपघातप्रकरणी कार चालकावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक फौजदार नागराज निंबाळे करीत आहेत.