सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट; अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापकास धरले धारेवर..
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 22, 2025 14:04 IST2025-11-22T14:03:50+5:302025-11-22T14:04:45+5:30
Solapur News: आज शनिवार २२ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली.

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट; अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापकास धरले धारेवर..
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - आज शनिवार २२ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला चांगले धारेवर धरले.
दरम्यान, शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांचे वाजवी पेक्षा जास्त पैसे घेतले जातात. अशा तक्रारी उपस्थित महिलांनी परिवहनमंत्र्यांच्याकडे केल्या. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश मंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पुढील ४ दिवसात त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना त्यांनी दिले आहेत. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिला.