Satara- Phaltan Doctor Death: फलटण प्रकरणातील ट्रँगल लोकांसमोर आणण्यासारखा नाही - मंत्री गोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:03 IST2025-11-01T14:01:24+5:302025-11-01T14:03:00+5:30
राजकारण थांबवावं; वस्तुस्थितीदर्शक तपासातून शिक्षा होईल

Satara- Phaltan Doctor Death: फलटण प्रकरणातील ट्रँगल लोकांसमोर आणण्यासारखा नाही - मंत्री गोरे
पंढरपूर : फलटणमधील डाॅक्टर तरुणी प्रकरणात मयत आणि दोन्ही आरोपींचे मोबाईल पाहिले तर परिस्थिती गंभीर आहे. हा ट्रँगल लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे आता विनंती आहे की, मृत्यूचं राजकारण थांबवावं. वस्तुस्थितीदर्शक तपास होऊ द्यावा. न्यायालयातून ज्या लोकांना शिक्षा व्हायची ती होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोरे म्हणाले, फलटण प्रकरणात वास्तव मांडण्याची पोलिसांना परवानगी दिली, तर जे वास्तव समोर येईल ते सर्वांना स्वीकारावे लागेल. या संपूर्ण प्रकरणाचे रहस्य मयत डाॅक्टर तरुणी आणि दोन आरोपींसह इतर काही मोबाईलमध्ये कैद आहे. मात्र, आपल्या संस्कृतीमध्ये जीवित किंवा मयत भगिनीबद्दल अनादर करण्याची पद्धत नाही. या प्रकरणाच्या आडून कोणी राजकीय पोळी भाजू नये. तपास पारदर्शी होऊन मृत डाॅक्टर तरुणीला न्याय मिळावा.
रामराजेंनी राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधू नये...
डाॅक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुतळा उभारणार, भाऊबीज साजरी करणार नाही, असे वक्तव्य केले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर गोरे यांनी चांगल्या माणसांचं नाव घ्या, असे सांगत राजकीय अस्तित्व गमाविलेली ही माणसे या प्रकरणाच्या आडून राजकीय पुनर्वसनाचा मार्ग शोधत आहेत. त्यांनी याचे भांडवल करू नये. जनता भोळी राहिलेली नाही. ४० वर्षे जनतेने तुम्हाला पाहिलंय. उगाच राजकारण करू नका, असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी दोन महिने खोटे बोलायचं नाही असं ठरवलं असावं...
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही मंत्री गोरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना टीका केली. त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतलेली नाही. त्यामुळे बोलणे उचित नाही, पण त्यांनी ठरवलं असावं वर्षांतील दोन महिने खोटे बोलायचे नाही. त्यामुळे त्यांनी माैन बाळगलं असावं, अशीही टीका केली.
तो महेबूब आयोग असलातरी चालेल...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना या प्रकरणाच्या तपासासाठी कुठला आयोग स्थापन करायचा असेल, तर त्यांनी नाव सुचवावे, मग तो महेबूब आयोग असला तरी आम्हाला चालेल. मात्र, त्यानंतर जे वास्तव पुढे येईल ते सर्वांना स्वीकारावे लागेल, असे गोरे यांनी सांगितले.
नऊ नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद...
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन हे नऊ नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल, तसेच यंदा अतिवृष्टीमुळे पंढरपूरला वारीत भाविकांची संख्या कमी आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत कदाचित भाविक घेऊ शकतात, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.