"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:49 IST2025-01-22T10:46:24+5:302025-01-22T10:49:05+5:30
वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण झाला आहे.

"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Raadhakrushna Vikhe Patil: भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. "वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या," असं विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण झाला आहे.
टेंभुर्णी येथे प्रकाश शामराव पाटील यांनी विकसित केलेल्या सुमन मल्टीप्लेक्स या अत्याधुनिक चित्रपटगृहाचे उद्घाटन संपन्न झाले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरस्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून "वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या," अशी टिप्पणी केल्याने भरसभेत चर्चेचा विषय ठरला. यावर पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. "हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्करांवर सरकार कारवाई करत आहे. उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढणार आहे," असं ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, बबनराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.