नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:41 IST2025-07-03T15:39:36+5:302025-07-03T15:41:06+5:30
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. अंघोळीसाठी निरा नदीत उतरला आणि काळाने डाव साधला. ३६ तासानंतर गोविंदाचा मृतदेह हाती लागला. तो मृतदेह बघून कुटुंबीयांनी आक्रोश केला.

नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
आजीसोबत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी तरुणावर काळाने वाटेतच घाला घातला. अंघोळीसाठी निरा नदीत उतरला आणि काळाने डाव साधला. २० वर्षांचा जालन्याचा गोविंद फोके मंगळवारी सकाळी पाण्यात वाहून गेला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. गोविंदा वाहून गेल्यानंतर आजीने हंबरडा फोडला, तर कुटुंबीयांच्या आक्रोशाने गावकरही हळहळले. मंगळवारपासून त्याचा शोध सुरू होता, अखेर ३६ तासानंतर गोविंदाचा मृतदेह हाती लागला. तो मृतदेह बघून कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यांच्या आक्रोशाने नीरेचा नदीकाठ गहिवरून गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नदीच्या प्रवाहासोबत मृतदेह वाहून गेल्याने एनडीआरएफ कडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू झाले. मृतदेह सापडत नसल्याने पंढरपूर येथील आदिवासी कोळी रेस्क्यू टीमचीही मदत घेण्यात आली. ३६ तासानंतर रेस्क्यू टीमला मृतदेह सापडला. अकलूजकडच्या दोन किलोमीटर लांब नीरा नदीत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृतदेह सराटी नदीकिनारी आणून फोके कुटुंबीयांना सोपवण्यात आला.
बुडणाऱ्या गोविंदाला होमगार्डने हात दिला, पण...
नीरा नदीच्या किनारी (अकलूजकडच्या दिशेने) गोविंद हा आंघोळ करण्यासाठी उतरला. तेव्हा त्याच्या दहा फूट अंतरावर होमगार्ड राहुल अशोक ठोंबरे (बारामती पथक) हे आंघोळ करीत होते. गोविंदला पोहता येत नव्हते. आंघोळ करताना त्याचा पाय घसरून समोरील भोवऱ्यात तो सापडला.
पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या गोविंदला पाहून शेजारील होमगार्ड राहुल ठोंबरे यांनीही लगेच पाण्यात उडी मारली. गोविंदच्या हाताला धरून ठोंबरे यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नदीचा प्रवाह तीव्र असल्यामुळे ठोंबरे यांच्या हाताला गोविंद लागला नाही. काही क्षणात गोविंद पाण्यात गायब झाला. त्यामुळे ठोंबरे हेही पाण्यातून बाहेर आले.
७५ वर्षात असे पहिल्यांदाच घडले
दिंडी क्रमांक १२ चे दिंडी प्रमुख यांनी विष्णू महाराज मस्के यांनी सांगितले, या घटनेमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. गोविंद हा चपळ होता. हुशार होता. दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याला तो मदत करायचा.
भोजनाला बसल्यावर तो प्रत्येकाला वाढायचा. आग्रह करायचा. त्याचा स्वभाव मनमिळाऊ होता, आणि बोलकाही. मागील 75 वर्षांपासून आमची दिंडी वारीत सहभाग होत आहे. पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.