Solapur ZP's special operation for troops; Proposal for home waiver of 2820 soldiers | सोलापूर झेडपीची सैन्यांसाठी खास मोहीम; २८२० सैनिकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव

सोलापूर झेडपीची सैन्यांसाठी खास मोहीम; २८२० सैनिकांच्या घरपट्टी माफीचा प्रस्ताव

सोलापूर : जिल्ह्यातील सैनिकांच्या २ हजार ८२० विधवा पत्नींच्या नावे असलेला मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यात जवळपास ७ हजार माजी सैनिक आहेत. त्याचबरोबर आजी सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागात रक्षणासाठी तैनात आहेत. जिल्ह्यात सैनिकांच्या विधवा पत्नींची संख्या २ हजार ८२० इतकी असून, त्यांच्यावर २८ हजार ९३२ जणांचा उदरनिर्वाह आहे. माजी सैनिक, सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्ता करात सूट देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा २३ नाेव्हेंबर २०२० चा अध्यादेश आहे

सैनिकांची जिल्हा परिषदेकडे वेगवेगळी प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. या कामासाठी त्यांना सुटी काढून यावे लागत आहे. त्यामुळे सैनिक व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबांचा सन्मान झाला पाहिजे या भावनेतून जिल्हा परिषदेतर्फे एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात प्रत्येक विभागाला त्यांच्याकडे सैनिकांची प्रलंबित असलेली कामे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्य सैनिक, आजी, माजी सैनिक, शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयाच्या जागा, घरबांधकाम, मालमत्ताकर, प्रमाणपत्र, नाहरकत अशी प्रकरणे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असतील तर त्यांनी तातडीने मार्गी लावावीत असे विभागप्रमुखांना कळविण्यात आल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.

नवीन सैनिकांचा शोध माजी सैनिक कल्याण कार्यालय व संघटना यांच्याकडून आलेली प्रकरणे व ज्या त्या ग्रामपंचायत हद्दीतील सैनिकांचाही शोध घेण्यात यावा. २५ फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये खास सैनिकांच्या प्रश्नांसाठी शिबिर घेतले जाणार आहे.

Web Title: Solapur ZP's special operation for troops; Proposal for home waiver of 2820 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.