उसने घेतलेल्या १ हजार रुपयांसाठी चापट मारली; शुद्ध हरपलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:05 IST2025-07-24T20:05:30+5:302025-07-24T20:05:52+5:30
सोलापुरात १ हजार रुपयांसाठी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उसने घेतलेल्या १ हजार रुपयांसाठी चापट मारली; शुद्ध हरपलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
Solapur Crime: सावकाराकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून नई जिंदगीत मंगळवारी एकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात एक हजार रूपयासाठी चापट मारल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
बुधवारी उसने दिलेल्या एक हजार रुपयाची मागणी करून झालेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार दुपारी सव्वाचारच्या सुमारास गुरुदत्त नगरात घडला. दशरथ अर्जुन धोत्रे असे मृत तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
दशरथ हा टेम्पो चालक होता. बुधवारी सुट्टी असल्याने ते घरीच होता. दशरथ हा घराजवळील ड्रेनेजच्या मोठ्या पाइपवर बसला होता. यावेळी पैशाच्या कारणावरून गोविंद बिराजदार याने त्याला चापट मारली. दशरथने १ हजार रुपये उसने घेतले होते. गुरुदत्त नगरात दोघे एकत्र असताना गोविंदने दशरथला त्याने दिलेले पैसे मागितले. यावेळी वाद होऊन गोविंदने दशरथला चापट मारली. यातच त्याची शुद्ध हरपली आणि तो खाली पडला. दशरथचा भाऊ युवराज याने तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दशरथ मृत पावल्याचे डॉक्टरांनी तपासणी करुन सांगितले. दशरथच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
दरम्यान या घटनेनंतर शवविच्छेदनानंतर दशरथच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्यावर संबंधितावर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात असे पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले.