सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 29, 2025 12:31 IST2025-04-29T12:31:39+5:302025-04-29T12:31:56+5:30
Solapur Crime: खोलीत कुणीच नसताना शिकाऊ डॉक्टराने स्वतःला संपवले

सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एका शिकाऊ डॉक्टराने वसतीगृहात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. हात व गळा चिरून घेऊन या युवा डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या डॉक्टरांच्या वसतीगृहातच तो राहत होता. हात व गळा चिरून या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. सन २०१९ च्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. डॉक्टराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच इतर डॉक्टरांची सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे. या घटनेची माहिती मिळतात सोलापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, सदर बझार पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे असे सांगण्यात आले.
दरम्यान, १८ एप्रिल रोजी सोलापुरातीलच प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे मानेला अटक करण्यात आली आहे.