सोलापूर: आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू, उमेदवारी देताना रुसवे फुगवे वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:44 IST2025-05-12T16:42:21+5:302025-05-12T16:44:27+5:30
स्थानिक गटातटात होणार निवडणुका : आदिनाथच्या निवडणुकीनंतर समीकरण बदलले

सोलापूर: आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू, उमेदवारी देताना रुसवे फुगवे वाढणार
करमाळा: गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांची पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता होती. नारायण पाटील यांच्याकडे दहापैकी सात तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे सदस्य व बागल गटाकडे दोन सदस्य होते. करमाळा नगरपालिकेवर गेल्या चार टर्मपासून जयवंतराव जगताप यांच्याकडे सत्ता असून गतपंचवार्षिक निवडणुकीत जगताप गटाने बागल गटाशी युती करून निवडणुका जिंकल्या होत्या. नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले होते; परंतु निवडणुका झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच जगताप व बागल यांची युती तुटली व विरोधात निवडणूक लढवलेल्या सावंत गटाने जगताप गटाबरोबर दोस्ताना करून संपूर्ण पाच वर्षे सत्तेत सहभाग नोंदवला, तर सत्तास्थानी असलेल्या बागल गटाला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागली. नागरिक संघटना विरोधात होती.
करमाळा मतदारसंघात आमदार नारायण पाटील यांच्यासोबत असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीसाठी जळवाजळवा सुरू केलेली आहे. पंचायत समिती व नगरपालिकेवर आपल्या गटाचा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. विधानसभा निवडणूक व आदिनाथ कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी अनेकांना शब्द दिला आहे. त्यामुळे अनेकांचे रुसवे फुगवे उमेदवारी देताना काढावे लागणार आहेत.
इच्छुकांची गर्दी..
पांडे जि.प. गटातून दादा जाधव, संतोष पाटील, संतोष वारे, वीट गटातून पंचायत समिती रावगाव सुजीत बागल, किरण फुंदे, युवराज कपाट पांडेकर, विनय ननावरे, शीतल क्षीरसागर, पोत्रे, सुनील सावंत, राहुल सावंत, संतोष वारे, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, चिकलठाण गटातून विकास गलांडे, चंद्रकांत सरडे जेऊर गणातून अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, अतुल मस्कर, सतीश नीळ, कोर्टी गटातून सविता राजेभोसले, सुभाष गुळवे इच्छुक आहेत.
करमाळा नगरपालिकेत पूर्वी १७ प्रभाग होते या निवडणुकीत २० प्रभाग केले आहेत. जिल्हा परिषदेत पूर्वी पाच गट होते. आता नव्याने चिकलठाण हा नवीन गट वाढल्याने जिल्हा परिषदेचे सहा गट झाले आहेत. पंचायत समितीत १० गण होते. आता नव्याने पंचायत समितीमध्ये दोन गण वाढल्याने १२ गण झाले आहेत. पंचायत समितीमध्ये झाले आहेत.
संजयमामा शिंदे, बागल गटाची भूमिका महत्त्वाची..
विधानसभा व आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटलांना जयवंतराव जगताप व सावंत गट यांनी पाठिंबा दिलेला होता, तर आदिनाथ कारखान्यामध्ये बागल गटाने नारायण पाटलांना छुपा पाठिंबा दिलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बागल कोणती भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांची 'एकला चलो रे'ची भूमिका कायम असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी संजयमामा शिंदे यांनी चालवलेली आहे. प्रा. रामदास झोळ गट निवडणूक रिंगणात उतरण्याची भाषा बोलू लागला आहे.