धक्कादायक; मुंबईच्या फौजदाराने गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 13:09 IST2021-09-04T13:09:16+5:302021-09-04T13:09:23+5:30

रक्तस्राव होऊन गर्भपात : सासरच्या मंडळींवरही गुन्हा दाखल

Shocking; Mumbai faujdar kicks pregnant wife in stomach | धक्कादायक; मुंबईच्या फौजदाराने गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ

धक्कादायक; मुंबईच्या फौजदाराने गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ

सोलापूर : ‘गर्भात वाढणारे मूल माझे नसून ते काढून टाक’, असे म्हणत पत्नीचा गळा दाबून तिच्या पोटावर मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षक पतीने लाथ मारली, तर दिराने विनयभंग केला. पीडित पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेचे २०२० मध्ये मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या आरोपीसोबत कुर्डुवाडी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी हा आपल्या कुटुंबीयांसोबत पीडित पत्नीला मुंबई येथे घेऊन गेला. तेथे काही दिवस पत्नीला चांगले नांदविले. त्यानंतर पीडितेची सासू, सासरे, दीर हे छोट्या-छोट्या कारणांवरून तिला त्रास देत उपाशी ठेवू लागले. दरम्यान, पीडित पत्नी ही गर्भवती राहिली. तेव्हा आरोपी पतीने हे मूल माझे नाही, तुझे कोणाबरोबर तरी संबंध आहेत, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत पीडितेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीच्या पोटावर जोरात लाथ मारल्यामुळे तिचा रक्तस्राव होऊन गर्भपात झाला. त्यानंतर पतीने पत्नीला सोलापूर येथे आणून सोडले.

दिराकडून विनयभंग

दरम्यान, दिराने वाईट हेतूने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर पतीने पत्नीला सोलापूर येथे आणून सोडले व जाताना पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत निघून गेले. दरम्यान, लग्नाच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या चुलत सासऱ्यानेही विविध जाचक अटी-शर्ती घातल्या. या आशयाची फिर्याद पीडित महिलेने सोलापुरात दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी पोलीस उपनिरीक्षक पती, सासू, सासरा, दीर, चुलत सासरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Shocking; Mumbai faujdar kicks pregnant wife in stomach