धक्कादायक; पत्नीला माहेरी पाठवून पतीने केले दुसरे लग्न; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 18:41 IST2022-03-20T18:41:17+5:302022-03-20T18:41:20+5:30

पत्नीने दिली फिर्याद : तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking; Husband marries second wife; Incident in Solapur | धक्कादायक; पत्नीला माहेरी पाठवून पतीने केले दुसरे लग्न; सोलापुरातील घटना

धक्कादायक; पत्नीला माहेरी पाठवून पतीने केले दुसरे लग्न; सोलापुरातील घटना

सोलापूर : हॉटेलच्या कामासाठी मुंबई येथे जायचे आहे, असे सांगून विवाहितेला माहेरी पाठविले अन् पतीने लातूर येथे जाऊन दुसरे लग्न केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पती धनंजय बाळकृष्ण ठेंगील (रा. राघवेंद्र नगर, मुरारजी पेठ सोलापूर), नणंद स्वाती सचिन हराळे, अश्विनी सिद्धेश्वर सरवदे (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किरण धनंजय ठेंगील (वय २९ रा. राघवेंद्र नगर मुरारजी पेठ) हिचा विवाह दि. ३ डिसेंबर २००९ रोजी धनंजय ठेंगील याच्या सोबत झाला. दि. २९ जानेवारी २०१५ रोजी किरण ठेंगील यांना मुलगी झाली. तेव्हा पतीने मला मुलगा हवा होता, असे म्हणत किरण ठेंगील हिला भांडू लागला. तू काळी आहेस, अडाणी आहेस, तुझा माझा संबंध संपला, तू मला घटस्फोट दे, मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे, असे म्हणत किरण हिचा मानसिक छळ करून त्यानंतर मारहाण केली. त्यानंतर किरणला माहेरी पाठवून पती, सासू, सासरे व दोन नंणदांनी लातूर येथे जाऊन धनंजय ठेंगील याचे अंबिका बंडगर हिच्यासेबत लग्न लावून दिले. याप्रकरणी पत्नीने फिर्याद दिली आहे.

चूक झाली म्हणून माफी मागितली

दुसरे लग्न केल्यानंतर धनंजय ठेंगील याच्या आई-वडिलांनी किरण ठेंगील यांच्या घरी जाऊन माफी मागून पुन्हा नांदायला ये, असे म्हणाले. दुसऱ्या पत्नीला लातूर येथे पाठवून देतो, असे सांगितले. किरण ठेंगील ही नांदायला गेली असता, दुसरी पत्नी घरातच होती. डिसेंबर २०२१ मध्ये किरण ठेंगील ही काही दिवसांसाठी माहेरी आली होती, ती पुन्हा सासरी जात असताना तिला येऊ दिले जात नव्हते. ती परत आली तर आम्ही सर्वजण विष पिऊन आत्महत्या करतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Web Title: Shocking; Husband marries second wife; Incident in Solapur