बोगस मतदानामुळे शरद पवार निवडून आले; सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:32 IST2019-02-24T18:29:08+5:302019-02-24T18:32:43+5:30
टेंभुर्णी: गेल्या २००९ ते २०१९ या दहा वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा शरद पवार केंद्रीय मंत्री होते. ...

बोगस मतदानामुळे शरद पवार निवडून आले; सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा आरोप
टेंभुर्णी: गेल्या २००९ ते २०१९ या दहा वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा शरद पवार केंद्रीय मंत्री होते. कार्यकर्त्यांवर आणि प्रशासनावर दबाव होता. त्यामुळे स्वर्गातून येऊनही लोकांनी मतदान केले. साम-दाम-भेद या तंत्राचा वापर केला गेला. आता २००९ सारखे २०१९ मध्ये चालणार नाही, अशी गंभीर टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
शनिवारी दुपारी टेंभुर्णी येथे आयोजित भाजपा बुथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहकारमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उपाध्यक्ष दादासाहेब साठे, तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, निवृत्ती तांबवे ,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संध्या कुंभेजकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रत्नाकर कुलकर्णी, प्रा. विजय शेटे, अनिल जाधव, अजय जाधव, अनंता चव्हाण, सरपंच बलभीम कोडक, दिलीप बारंगुळे, संजय टोणपे, योगेश पाटील, धनंजय महाडिक, मदन मुंगळे, पोपट अनपट ,नितीन गायकवाड ,गिरीश तांबे, भारत माने, विजय पवार, प्रवीण मस्के, राजेंद्र बागल, बबनभाऊ केचे उपस्थित होते .
भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, २००९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाचा एकाही गावात सरपंचही नव्हता. निवडणूक जिंकण्यासाठी बुथवरील माणूस महत्त्वाचा आहे .
तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी चार वर्षे भाजपाचे लाभार्थी असलेल्यांना आता तरी पक्षात घ्या किंवा त्यांना दूर करा. पवारांनी खासदार झाल्यावर माढ्याचे बारामती करण्याचे सोडाच, लोकांशी संपर्कही ठेवला नाही. फक्त साखर कारखान्यावर भेटी देण्याचे काम केले, अशी टीका केली.
कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा
देशमुख म्हणाले की, लोकमताचा व कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र्रीय निवड समिती उमेदवारी जाहीर करेल, तोपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम बाळगा. माढा लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे आता सांगता येत नाही, परंतु तो कमळाच्या चिन्हावर असेल . कार्यकर्त्यांनी व्यक्तिनिष्ठ न राहता पक्षनिष्ठ राहिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी जास्त उतावीळ होऊ नये.