...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:05 IST2025-11-20T15:05:19+5:302025-11-20T15:05:49+5:30
लोकसभेला मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार उभा होता. तरीही माझ्या तालुक्यातून १५ हजारांचे लीड भाजपा उमेदवाराला आहे असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
सांगोला - आजारपणाचा कुठलाही विचार न करता काम करत राहिलो, मृत्यूच्या दारात असतानाही लोकसभेच्या प्रचारात उतरलो. भाजपा उमेदवाराला १५ हजारांचं मताधिक्य दिले, याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का असा सवाल करत शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकारणावरून शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा असा कुठला शब्द मी मोडला होता, हे त्यांनी सांगावे. लोकसभेला मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार उभा होता. तरीही माझ्या तालुक्यातून १५ हजारांचे लीड भाजपा उमेदवाराला आहे. जर मी लोकसभेला प्रचार सोडून ऑपरेशन केले असते तर आज माझा आजार बिकट अवस्थेत गेला नसता. लवकर ऑपरेशन करा असं मला डॉक्टर सांगत होते, मात्र खासदारकी पार पाडल्यानंतर ऑपरेशन करायचे ठरवले. ३ महिने मी डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही मित्रपक्षाचा उमेदवार आहे, रणजितसिंह निंबाळकर मित्र होते, मी आपला जीव पणाला लावून प्रचारात उतरलो. सांगोल्यात जे घडतंय ते त्यांना कळत नाही का? असं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले आहे.
शिंदेसेनेविरोधात विरोधक एकवटले
सांगोला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी २१ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत आहे. त्यानंतर इथले चित्र स्पष्ट होणार आहे. याठिकाणी भाजपा, शेकाप, दीपक आबा गट एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे. त्यात शिंदेसेनेने नगराध्यक्षपदासह २३ जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सांगोला नगरपालिकेच्या मैदानात शिंदेसेना एकाकी पडली आहे. त्यावरून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपाला सवाल केला.
दरम्यान, नुकतेच शहाजीबापू पाटील यांनी भाजपावर अत्यंत घणाघाती टीका केली होती. भाजपाची शेकापशी युती म्हणजे दहशतवाद, एखाद्या आबलेवर केलेला अत्याचार असावा याच पद्धतीने भाजपाचे वागणे मला दिसून आले आहे. भाजपाचं राजकारण असं असेल तर ही युती हिडीस, किळसवाणी वागणूक असून या वैभवशाली महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसांत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली होती.