शाळा म्हणजे संस्कार केंद्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:01 PM2019-06-18T13:01:31+5:302019-06-18T13:01:54+5:30

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही ...

The school means the ritual center ...! | शाळा म्हणजे संस्कार केंद्र...!

शाळा म्हणजे संस्कार केंद्र...!

googlenewsNext

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. मुलांची ‘पहिली शाळा’ ही आईच असते. परंतु, ज्यावेळी मुलगा चार-पाच वर्षांचा होतो, तेव्हा प्रत्येक पालक आपल्या पाल्याचा एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा प्रयत्न करतात. सर्वजण चांगली शाळा शोधत असतात. परंतु, चांगली शाळा म्हणजे काय हो ? मोठी इमारत, मोठे अंगण, बगिचा, पिण्याचे पाणी एवढंच? तर नाही. या तर आवश्यक आहेतच, या सर्व सोयी असल्या तर आपण त्या शाळेला चांगली शाळा म्हणू. पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही.

आदर्श शाळा ही नुसती शाळा नसून ते एक विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला, अनुभवी, प्रेमळ शिक्षक वर्ग - शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळासुद्धा आदर्श बनते. आणि अशा शाळेत विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्याचे काम सुरू असते. चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास ज्या शाळेत होतो ती आदर्श शाळा ठरते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे असेल तर ते कुठेही मिळते. पण विद्यार्थ्यांमधील खेळाडूवृत्ती, कला, संशोधक वृत्ती इ. बºयाच गुणांना वाव मिळवून देण्यासाठी मंच तयार करून देणे व त्यांना योग्य व्यक्तीकडून योग्य वेळी मार्गदर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांकडे वेळच नाही, आपल्या पाल्यांसाठी. पालकांची मानसिकता बदललेली आहे. ते शिक्षकांवरच पूर्णपणे अवलंबून आहेत. चांगल्या शाळेत प्रवेश करूनसुद्धा कुठे ना कुठे कोचिंगसुद्धा लावतात. कोचिंग लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर कोचिंगच्या शिक्षकांऐवजी पुन्हा शाळेच्या शिक्षकांवरच त्यांच्या सर्व आशा असतात.

अशा सर्व परिस्थितीत केवळ पालकांना दोष देऊन चालणार नाही तर यावर तोडगा काढावा लागेल आणि हेसुद्धा शाळेचेच काम आहे; म्हणजे आदर्श शाळेचेच काम आहे. अशा स्थितीत ज्या शाळेतील शिक्षक हे शिक्षक व पालक अशी दुहेरी भूमिका निभावतात, ते शिक्षक व ती शाळा आदर्श शाळा ठरते.

योग्य शिक्षण मिळाले, सुप्त गुणांचा विकास झाला, पण विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये नसतील तर त्याचा काय फायदा? शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकविते, माणसाला माणूस बनविते़ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस प्रगती तर करत आहे परंतु, त्याच्यामधील मानवता हळूहळू नष्ट होत आहे. स्वार्थी वृत्ती वाढत आहे. स्पर्धेच्या युगात चांगले-वाईट यातील फरक न समजून घेता प्रत्येक व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशावेळी तो दुसºयांना सोबत न घेता त्यांना खाली पाडून स्वत: पुढे कसे जाता येईल याचाच विचार करत आहे आणि हे सर्व घडत आहे ते मुलांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे, म्हणून मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि जी शाळा विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यात यशस्वी ठरते तीच आदर्श शाळा बनते. एकंदरीत विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा देण्याबरोबर योग्य शिक्षण, योग्य संस्कार, त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास करणारी शाळाच आदर्श शाळा ठरते.
- संयोगिता सुभाष गुरुजी,
(लेखिका या शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत.)

Web Title: The school means the ritual center ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.