रिअल ‘सिंघम’; धावत्या गॅस टँकरवर चढून भरकटलेली गाडी ‘ट्रॅफिक कंट्रोल’
By Appasaheb.patil | Updated: September 12, 2020 13:39 IST2020-09-12T13:09:34+5:302020-09-12T13:39:53+5:30
सोलापूर लोकमत विशेष...

रिअल ‘सिंघम’; धावत्या गॅस टँकरवर चढून भरकटलेली गाडी ‘ट्रॅफिक कंट्रोल’
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्याजवळ बेशुध्दावस्थेतील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले होते़ प्रसंगावधान राखून महामार्ग पोलिस मदत केंद्रातील पोलीस नाईक संजय चौगुले यांनी सतर्कतेने मोठया शिताफीने चालू गॅस टँकरवर चढून, दरवाजा उघडून ब्रेक मारून धावता टँकर थांबविला़ त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावरील पाकणी येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले (बक्कल नंबर २२५) हे सेवा बजावित होते़ यावेळी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक वेडावाकडा येत असल्याचे चौगुले यांच्या निर्दशनास आला़ त्यानंतर चौगुले यांनी त्या ट्रकचालकाला हात दाखवित थांबविण्याचा इशारा केला, परंतू ट्रकचालक हा सीटवर पडलेला दिसला़ त्यानंतर पोलिस नाईक चौगुले यांनी मोठया शिताफीने गॅस टँकरवर चढून चालकाच्या साईडचा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला.
पोलिस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली. दरम्यान, चौगुले यांच्या कार्याचे शुक्रवारी व शनिवारी दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.