पोलीस रस्त्यावर आहेत, ते केवळ जनतेच्या संरक्षणासाठी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:28 PM2020-05-28T14:28:44+5:302020-05-28T14:31:41+5:30

पोलीस आयुक्त लिहितात ‘लोकमत’साठी; संकट नैसर्गिक आहे मात्र त्यावर आपण मात केली पाहिजे

The police are on the streets, only for the protection of the people ...! | पोलीस रस्त्यावर आहेत, ते केवळ जनतेच्या संरक्षणासाठी...!

पोलीस रस्त्यावर आहेत, ते केवळ जनतेच्या संरक्षणासाठी...!

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ पोलिसांना बाधा झाली, सध्या ११ जणांवर उपचार सुरू; पुन्हा उपचारानंतर होतील सज्जशहरात सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना परवानगी देण्यात आली नाहीपण लक्षात ठेवा कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने नियम हा पाळलाच पाहिजे

कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने सध्या जगभरात थैमान घातले आहे. अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशियासारख्या बलाढ्य देशातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतामध्येही याचा शिरकाव झाला अन् याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. शासनाच्या आदेशावरून सध्या शहरात काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ हा संसर्ग वाढू नये व जनतेचे संरक्षण व्हावे म्हणून सध्या शहरात पोलीस रस्त्यावर आहेत. 

दि. २२ मार्चचा जनता कर्फ्यू संपण्याअगोदरच मुंबई, पुणे येथील परिस्थिती पाहून महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली. महाराष्ट्रात इतरत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दि. ११ एप्रिलपर्यंत सोलापुरात एकही रुग्ण नव्हता. मात्र, अचानक दि. १२ एप्रिल रोजी तेलंगी पाच्छापेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. त्याच्या अहवालात कोरोना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले. सोलापूरला सुरक्षित समजत होतो; मात्र अचानक आलेल्या अहवालावरून आम्हाला अधिक काळजी घ्यावी लागली. पहिल्यांदा तेलंगी पाच्छापेठ सील करावी लागली. अवघ्या दोन दिवसांत रविवार पेठेतील मुंबईच्या पोलीस कर्मचाºयाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आणि तोही परिसर सील करावा लागला. 

भारतरत्न इंदिरा नगर येथे एक महिला पॉझिटिव्ह आढळल्याने या भागासह सत्तर फूट रोड व कुमठा नाका परिसरही सील करावा लागला. हळूहळू शहरातील रुग्णांची संख्या वाढत गेली आणि त्यात जिथे कोरोनाचे पॉझिटिव्ह व मृत झालेले आढळून आले तेथील परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. सुरुवातीच्या काळात चौकाचौकात बंदोबस्त लावून विनाकारण फिरणाºयांवर कारवाई केली जात होती. लोक ऐकत नसल्याचे पाहून वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली. आज साडेसहा हजार वाहने जप्त केली आहेत. यामध्ये रिक्षा व चारचाकी कारचाही समावेश आहे. दरम्यान, आलेल्या सण-उत्सवाबाबत लोकांना आवाहन करण्यात आले, त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. 

सकारात्मक भूमिका मनात ठेवून पोलिसांनी शहरात पोलिसिंग केली. शहराबाहेरील लोकांना प्रवेश करता येऊ नये म्हणून सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आठ ठिकाणी बॉर्डर सीलिंग करण्यात आले आहे. मोटारवाहन कायद्यान्वये व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केल्यामुळे शहरात मोकाट फिरणाºयांना आवर बसला. शासकीय रुग्णालय असो किंवा महापालिका प्रशासन जिथे गरज भासेल तेथे पोलिसांनी तत्परतेने मदत केली आहे. हे करीत असताना आम्ही पोलिसांचीही तितकीच विशेष काळजी घेतली. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक औषधे व मोसंबी, संत्रा अशी फळे पोलीस कर्मचाºयांना वाटप करण्यात आली. 

संकट नैसर्गिक आहे मात्र त्यावर आपण मात केली पाहिजे, नव्हे ती करणारच आहोत. प्रत्येकांनी आपली काळजी घेतली, दिलेल्या नियमांचे पालन केले तर हे सहज शक्य आहे. यामध्ये कोणावर अन्याय होत नाही, मात्र शिस्त सर्वांनी जर दाखवली तर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर येत नाही. पोलीस हा देखील वर्दीच्या पाठीमागील एक माणूस आहे, त्यालाही भावना, मन आहे. पण लोकांच्या सुरक्षेसाठीच पोलिसांना कारवाई करावी लागते. झाले, आणखी थोडे दिवस थांबा, लवकरच आपण यावर मात करू आणि यशस्वी होऊ. सर्वांनी सकारात्मक भावना मनात ठेवावी, स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी. लवकरच आपण सर्व जण यातून बाहेर पडू आणि पुन्हा पहिल्यासारखे दिवस अनुभवू, असा माझा विश्वास आहे.

१३ पोलिसांना बाधा झाली, सध्या ११ जणांवर उपचार सुरू; पुन्हा उपचारानंतर होतील सज्ज
शहरात कर्तव्य पार पाडत असताना एका पोलीस अधिकाºयाला व एका पोलीस कर्मचाºयाला कोरोनाची बाधा झाली. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ११ पोलीस कर्मचाºयांवर यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येतील आणि आमचे पोलीस पुन्हा जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज राहतील.

गरजेनुसार व्यवहार सुरू होतील...
शहरात सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. परिस्थिती पाहून हळूहळू गरजेनुसार अन्य दुकानांना परवानगी दिली जाईल. पकडण्यात आलेली वाहनेही सोडली जातील, पण लक्षात ठेवा कोरोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने नियम हा पाळलाच पाहिजे. याला सध्यातरी दुसरा उपाय नाही.

Web Title: The police are on the streets, only for the protection of the people ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.