पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:48 IST2025-08-09T05:47:59+5:302025-08-09T05:48:54+5:30
या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
सोलापूर : राजकीय वैमनस्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हंडे यांना घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी कर्नाटकातील झळकी येथून आरोपींना पाच तासात पकडले. शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी हंडे यांची भेट घेऊन या हल्ल्याचे मास्टरमाइंड आमदार राेहित पवार आहेत, असा आराेप केला.
या प्रकरणातील आरोपी अमित म्हाळप्पा सुरवसे, सुनील भीमाशंकर पुजारी, दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आमदार पडळकर यांच्या शरणू हांडे या कार्यकर्त्याच्या अपहरणाचा कट गुरुवारी रात्री उघडकीस आला. याबाबत आमदार पडळकर म्हणाले, माझ्या गाडीवर २०२१ साली अमित सुरवसे याने माेठा दगड टाकला. शरणू हांडे याला अमानुषपणे मारायचा अमित सुरवसे याचा प्लॅन हाेता.
गाडीत असताना अमितने एक व्हिडीओ काॅल केला. या व्हिडीओ काॅलवर त्याला माफी मागायला सांगण्यात आली. पण शरणूने नकार दिला. हा काॅल आमदार राेहित पवार यांना केल्याचे पडळकर म्हणाले.