मनसेची माणुसकी; 'त्या' उत्तर भारतीय तरुणाच्या मृतदेहावर स्वत: केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 13:42 IST2018-10-07T13:37:39+5:302018-10-07T13:42:43+5:30
मनसे म्हटले की खळखट्याक अन् उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांचा विरोध. उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांना त्रास देणे हेच मनसैनिकांचे काम, असं समीकरणच बनलंय. पण सोलापुरातील एक घटनेमुळे मनसेची ही ओळख पूर्णतः बदलली गेलीय.

मनसेची माणुसकी; 'त्या' उत्तर भारतीय तरुणाच्या मृतदेहावर स्वत: केले अंत्यसंस्कार
बार्शी (सोलापूर) - मनसे म्हटले की खळखट्याक अन् उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांचा विरोध. उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांना त्रास देणे हेच मनसैनिकांचे काम, असं समीकरणच बनलंय. पण सोलापुरातील एक घटनेमुळे मनसेची ही ओळख पूर्णतः बदलली गेलीय. मनगिरे मळा येथे शुक्रवारी (5 ऑक्टोबर) पहाटे पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत राजेश साहू नावाचा उत्तर प्रदेशातील तरुण मृत्युमुखी पडला, तर त्याच्या पत्नीची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे. पत्नी रुग्णालयात, घरात पित्याचे छत्र हरवलेला चिमुकला आणि उर्वरित कुटुंब उत्तर प्रदेशात. यामुळे राजेश यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी मनसैनिकांनी पुढाकार घेत राजेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मनसेच्या या कृतीमुळे नेहमी उत्तर प्रदेश - बिहारींच्या रागाचा विषय असणारी मनसे आज त्यांच्या हृदयात घर करुन बसली आहे.
बार्शी तालुका मनसे अध्यक्ष विक्रमसिंह पवार यांनी आपल्या कार्यातून मनसेची प्रतिमाच बदलली. तसेच मनसे ही उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांच्या विरोधात नसून केवळ मराठीला विरोध करणाऱ्याविरूद्ध लढते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राजेश साहू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला. मनसेचे विक्रमसिह पवार यांनी राजेश यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली.तसेच राजेश यांच्या चिमुकल्या मुलास कवेत घेऊन त्यास धीर दिला. 'आपण परप्रांतीयांच्या विरोधात नसून जे मराठीविरुद्ध वागतात त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. जे लोक महाराष्ट्रासाठी काम करतात, अशा प्रत्येक नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत राहील'', असेही पवार यांनी यावेळी म्हटले.