मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:29 IST2025-04-18T10:29:03+5:302025-04-18T10:29:27+5:30
अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
BJP Nitesh Rane : भाजप नेते आणि राज्याचे मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे यांचे सोलापुरात स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सात रस्ता परिसरात लावलेले डिजिटल फलक महापालिकेने गुरुवारी हटवले. तर दुसरीकडे, विमानतळाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्यांचे फोटो दाखवत निषेध केला.
अक्कलकोट तालुक्यातील सभेसाठी मंत्री नितेश राणे यांचे गुरुवारी सायंकाळी होटगी रोड विमानतळावर आगमन झाले. विमानतळाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. मात्र यादरम्यान, उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष घोडके, विकी खंडागळे, किरण मिश्रा, प्रदीप गायकवाड यांनी राणेंचा ताफा जात असताना फोटो दाखवत निषेधाच्या घोषणा दिल्या. तोपर्यंत ताफा निघून गेला. विजापूर नाका पोलिसांनी चौघांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस दिल्याचे घोडके यांनी सांगितले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे विमानतळ परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, "आम्ही आंदोलन केले. निषेध म्हणून काळे झेंडे दाखवलेले नाहीत. कोंबड्यांचे फोटो दाखवणे हा काही गुन्हा होत नाही. तरीही आम्हाला पोलिसांनी बोलावून घेतले. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत," असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख संतोष घोडके यांनी म्हटलं आहे.