कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 06:01 IST2025-09-13T06:00:47+5:302025-09-13T06:01:26+5:30
दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शुक्रवारी कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी माजी सरपंच आण्णासाहेब ढाणे यांनी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर खुनाचा आरोप केला.

कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : कुर्डू येथील मुरूम उत्खननप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शुक्रवारी कुर्डू गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी माजी सरपंच आण्णासाहेब ढाणे यांनी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर खुनाचा आरोप केला आहे. यावर खा. मोहिते-पाटील यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही प्राप्त झालेल्या अहवालानुसार कुर्डूचे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचे सांगितले.
कुर्डू मुरूम उत्खननप्रकरण गेल्या बारा दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रशिक्षणार्थी आयपीएस अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्यातील व्हायरल झालेल्या संवादामुळे राज्यभर गाजत आहे.
अवैध मुरुम उपसा व सरकारी कामात अडथळाप्रकरणी वीस ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी शंभर टक्के गाव बंद पाळला.
एक खून नाहीतर सोळा-सतरा तरुण मुलांचे खून अकलूज भागात झाले. खुनाची सिरीयल खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लावली आहे. त्यामुळे ते अकलूजचाच नाहीतर सोलापूर जिल्ह्यातला वाल्मिक कऱ्हाड आहेत.
- अण्णासाहेब ढाणे, माजी सरपंच, कुर्डू
मी कोणावर आरोप केला नाही. पुराव्यानिशी केंद्राकडे तक्रार केली आहे. आता माझ्यावर कोण बोलत असतील तर याप्रकरणी कोर्टात जाणार आहे. - धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार