Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:39 IST2019-10-08T16:38:04+5:302019-10-08T16:39:50+5:30
प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही

Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...
सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असं वक्तव्य करुन सुशीलकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे संकेत दिलेत. सोलापूरच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला आहे.
यावर बोलताना राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशात हिटलरशाही वाढतेय, शिवसेनेनेही सामना अग्रलेखातून हीच भूमिका मांडली आहे, त्यामुळे देशातील हिटलरशाहीविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर चांगलेच आहे. जातियवादी शक्तींना रोखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण यावर भाष्य करणं जितेंद्र आव्हाडांनी टाळलं.
तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीहीभाजपा-शिवसेना या जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच ऊर्जा आहे. आगामी निवडणुकीत चमत्कार नक्की दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा सुरु होती. मात्र राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाचं वृत्त तेव्हा फेटाळून लावलं होतं. देशातील वातावरण एकाच पक्षाच्या बाजूने वाहत असताना राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावं असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मत मांडले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे स्वत:चे अस्तित्व असून ते अस्तित्व कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलं होतं.