अखेर सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे; वळसे-पाटलांची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 14:58 IST2020-03-31T14:30:52+5:302020-03-31T14:58:50+5:30
कोरोनाचा राजकीय दणका; जिल्ह्यातील राजकीय घडामोडी बदलणार...

अखेर सोलापूरचं पालकमंत्रीपद जितेंद्र आव्हाडांकडे; वळसे-पाटलांची उचलबांगडी
सोलापूर : कोरोना विषाणूने आता राजकीय दणके द्यायला सुरुवात केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून नवे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापुरात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. राेजगार बंद असल्याने गोरगरीबांना धान्य मिळत नाही. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनात समन्वय नाही. सरकार कर्मचाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे याकडे लक्ष नसल्याची टीका विरोधी पक्षातून होत होती.
काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड तत्काळ सोलापुरात यावे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक घ्यावी. गोरगरीबांसाठी धान्य वाटप सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका फुलारे यांनी केली आहे.