Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 17:23 IST2021-04-08T17:14:53+5:302021-04-08T17:23:46+5:30
Ajit Pawar talk on Sachin Vaze's Letter alligation: सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती.

Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान
पंढरपूर - सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत, या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज आले आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळेंच्या फार्महाऊसवर स्नेहभोजनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासा हा केला.
यावेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. तरीही माझे नाव का घेतले हे मला माहिती नाही माझे याप्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी लस मिळत नाही. सुरवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली पण ठीक आहे. ती पण आपलीचं भावंड आहेत. आपल्या देशात तयार होणारी लसं आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्या ऐवजी, आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीचं वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठराविक दिवसात लसीकरण संपावायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगिरथ भालके, उमेश पाटील, उत्तम जानकर आदी उपस्थित होते.