पालघरजवळ अरबी समुद्रावर भारतातील पहिले विमानतळ होणार; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
By आप्पासाहेब पाटील | Updated: October 15, 2025 16:40 IST2025-10-15T16:38:46+5:302025-10-15T16:40:14+5:30
येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संकेत

पालघरजवळ अरबी समुद्रावर भारतातील पहिले विमानतळ होणार; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : येत्या काही दिवसात महाराष्ट्र शासन पालघरजवळ समुद्राजवळ विमानतळ उभे करण्यात येणार आहे. त्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याचे संकेत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरात दिली.
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्टार एअरलाइन्सचे संजय घोडावत यांच्यासह अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पालघरजवळ अरबी समुद्रावर भारतातील पहिले ऑफशोअर विमानतळ बांधले जात आहे, जे मुंबईचे तिसरे विमानतळ असणार आहे. याचे बांधकाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. हे विमानतळ एका कृत्रिम बेटावर बांधले जाईल, जे समुद्रात मुख्य भूभागापासून काही किलोमीटर अंतरावर असणार असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दर ४० दिवसाला एक विमानतळ होतंय, देशातील सर्वाधिक विमानतळ महाराष्ट्रात असून उडाण योजनेतून ९९ विमानतळ सुरू आहेत. राज्यात ४३७ हवाई मार्ग सुरू असून आतापर्यंत दीड कोटी लोकांनी प्रवास केला. दहा वर्षात या देशातील विमानाने प्रवास करणारे लोक ३८ कोटी लोकांनी विमानाने प्रवास केला आहे. जागतिक स्तरावर देशातंर्गत विमानसेवेत भारत तिसर्या क्रमांकावर असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.