पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:39 IST2019-08-07T12:36:27+5:302019-08-07T12:39:24+5:30
शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान; प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान
पटवर्धन कुरोली : सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या तुफान पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेल्याने पिराची कुरोली, अकलूज परिसराकडे सुरू असलेला संपर्क बंद झाला आहे. नदीकाठचे शेकडो हेक्टर उसाचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठवरील पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, आव्हे, तरटगाव, खेडभाळवणी, कौठाळी, शिरढोण, गुरसाळे आदी गावांमध्ये सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन इतर ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे.
पटवर्धन कुरोली येथील रेणुकामाता मंदिर पाण्यात गेले आहे. पटवर्धन कुरोली बंधाºयावरून अकलूज, सांगोला परिसरात मोठी वाहतूक असते. मात्र या वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू असणारा पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेल्याने या परिसराचा संपर्क तुटला आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल
- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठचे शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच वीज वितरणने नदीकाठच्या परिसरातील काही रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केला आहे. यात मुख्य लाईनवरच अनेक वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे नदीपासून काही अंतरावर असलेली रोहित्रे बंद करण्याचा सपाटा वीज वितरणने सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असली तरी काही वाड्यावस्त्यांवर वीज व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक, जनावरांचा संघर्ष सुरू आहे.
ऊस पाण्याखाली
- चालू वर्षी असलेल्या भीषण दुष्काळाशी सामना करत नदीला पिण्यासाठी सोडलेल्या पाण्यावर नदीकाठच्या शेतकºयांनी मोठ्या कष्टाने शेकडो हेक्टर उसाचे संगोपन केले होते. शेकडो हेक्टर उसात पुराचे पाणी शिरल्याने ऊस भुईसपाट झाला आहे.