मंगळवेढ्यात नरबळीचा प्लॅन? १० फूट खोल खड्डा, बाहेरील मांत्रिक आणि नशेत असलेला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:47 IST2026-04-01T13:46:01+5:302026-04-01T13:47:12+5:30
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असून, त्यासाठी कर्नाटकातील विजयपूर येथून मांत्रिक बोलावला गेला होता.

मंगळवेढ्यात नरबळीचा प्लॅन? १० फूट खोल खड्डा, बाहेरील मांत्रिक आणि नशेत असलेला तरुण
Solapur Crime News : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका घरात ही अघोरी पूजा केली जात होती. यासाठी एका तरुणाच्या 'नरबळी'चा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दिनेश वेदपाठक या तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा भाऊ दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला दारू पाजून नशेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्नाटकातून मांत्रिक बोलावला
ज्या घरात अघोरी पूजा मांडण्यात आली होती, त्याच घरात सुमारे १० फूट खोल खड्डा खोदला गेला होता. तिथेच बाजूला अघोरी पूजा मांडण्यात आल्याचेही समोर आले आहे. या पूजेसाठी कर्नाटकातील विजापूर येथून मांत्रिक बोलावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलिसांनी 'नरबळी'चा प्रकार झाल्याचे स्पष्टपणे फेटाळले असून, सदर प्रकरण अंधश्रद्धेशी संबंधित पूजेचा भाग असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
घटनेबद्दल उपस्थित झालेले प्रश्न?
या घटनेनंतर काही प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. १० फूट खोल खड्डा नेमका कशासाठी खोदण्यात आला? बाहेरील मांत्रिकाला का बोलावण्यात आले?, संबंधित तरुणाला नशेत ठेवण्यामागील उद्देश काय? अशी चर्चा होत आहे.
"घटनास्थळी आम्ही स्वतः भेट देऊन पाहणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार नरबळीशी संबंधित नसून उंबराचे झाड काढण्यासाठी काही विधी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, कोणताही गैरप्रकार घडलेला नाही, याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे", असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी सांगितले.