होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:41 IST2020-04-15T13:38:45+5:302020-04-15T13:41:45+5:30
ऑनलाइन निवेदनाची घेतली दखल; सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगावचा पाणी प्रश्न मिटला...!!

होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !
पंढरपूर :- होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली, भंडिशेगाव या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत उपरी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे आॅनलाईन निवेदन पाठवून मागणी केली होती.
उजनी उजव्या कालव्यावर असणार्या कासाळगंगा ओढ्यावर सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगाव याठिकाणचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना, कासाळगंगा ओढ्यातील पाणी पुर्णपणे आटले होते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता.
यासंदर्भात उपरी ग्रामपंचायतच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आॅनलाईन निवेदन पाठवून, कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आ. शहाजीबापू पाटील, आ. प्रशांत परिचारक यांच्याकडेही निवेदन दिले होते. सदर मागणी पालकमंत्री आव्हाड यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी सहकार्य करुन, सदर प्रश्नाचे गांर्भीय पालकमंत्र्यांच्या कानावर घातले. डाॅ. आव्हाड यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकार्यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यात आले असून उपरी,पळशी,सुपली व भंडिशेगाव या चार गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.