- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता राज्यभरातील शेतकरी आक्रमक होत असल्याचे दिसून येत असताना शुक्रवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे..असे पंढरपूरच्या विठ्ठलाकडे साकडे घातले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका मांडली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शासनाने निवडणूक काळात दिलेला शब्द पाळावा अशीही मागणी शेट्टी व शिंदे यांनी केली.
नागपूर - गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकरी संघटना येत्या दोन ते तीन दिवसानंतर आक्रमक भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जात आहे. सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा चालूच राहील. हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी पंढरपूरात दिला.
यावेळी बंटी पाटील, अजित पवार, किशोर ढगे, महेश खराडे, विठ्ठल मोरे, तानाजी बागल, शिवाजी पाटील, विजय रणदिवे यांच्यासह आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.