सोलापुरातील अल्पवयीन मुलीला इंदौर येथे पळवून नेताना धुळ्यामध्ये चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 10:51 IST2020-11-20T10:50:30+5:302020-11-20T10:51:00+5:30
स्मार्ट सिटीच्या कामगाराचा प्रताप; फौजदार चावडी पोलिसांनी तत्काळ केली कारवाई

सोलापुरातील अल्पवयीन मुलीला इंदौर येथे पळवून नेताना धुळ्यामध्ये चौघांना पकडले
सोलापूर : शहरातील एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्यप्रदेश मधील इंदौर येथे पळवून नेत असताना, स्मार्ट सिटीच्या चार कामगारांना धुळे येथे अटक करण्यात आली आहे.
शहरात सध्या ठिकठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. या कामावर मध्य-प्रदेश, उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणचे कामगार काम करत आहेत. शहरातील अशाच एका ठिकाणी स्मार्ट सिटी चे काम सुरू आहे. दरम्यान गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास तेथील एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चौघांनी गोड बोलून जवळ बोलावून घेतले. तिला घेऊन चौघेजण मालट्रक मधून इंदोर च्या दिशेने निघाले होते. आपली मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. तेव्हा ती मुलगी मालकी तिथे काम करणाऱ्या कामगारांसोबत दिसली होती असे समजले.
आईवडिलांनी तात्काळ फौजदार चावडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. माहिती समजतात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी तत्काळ पथक तयार करून मोबाईल वरून लोकेशन घेत धुळे गाठले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेसह चौघांना अटक केली. अल्पवयीन मुलीसह चौघांनाही घेऊन फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सोलापूरला येत आहेत. या प्रकारामुळे घटना घडलेल्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे. हे चौघेही जण स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामावर बिगारी म्हणून काम करतात अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.