फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

By विलास जळकोटकर | Published: May 15, 2024 08:06 PM2024-05-15T20:06:18+5:302024-05-15T20:06:31+5:30

अश्लील वर्तन : विनयभंगासह खंडणीचा गुन्हा; आरोपीला पोलिस कोठडी

Extortion of six and a half lakhs by threatening to make the photo viral | फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन साडेसहा लाखाला गंडा

सोलापूर : ओळखीतून मैत्री झाल्याने भेटीचा गैरअर्थ काढून पीडितेशी अश्लील वर्तन केले आणि एकत्रित काढलेले फोटो नातेवाईक व मित्रांना व्हायरल करतो म्हणून वेळोवेळी तब्बल ६ लाख ५७ हजार ५०० रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार १९ वर्षीय पीडितेने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. हा प्रकार सप्टेंबर २०२३ पासून आजतागायत घडल्याचे म्हटले आहे. आरोपीविरुद्ध भा.दं.वि. ३५४, ३८४ अन्वये विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा नोंदला आहे.

कृष्णकांत अमर रिजोरा (वय ४३, रा. रुबीनगर, सोलापूर) याला बुधवारी रात्री उशिरा अटक करून बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला कोठडी संपताच न्यायालयात उभे केले जाणार आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि आरोपीची सप्टेंबर २०२३ मध्ये शहरातील एका महाविद्यालयासमोर ओळख होऊन मैत्री झाली. ते एकमेकांना भेटत असत. या कालावधीत आरोपीचे दोघांचे एकत्र फोटो, व्हिडीओ काढून घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याने पीडित तरुणीला बोलावून घेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावर पीडितेने त्याला ढकलून दिल्याने तो रागाने निघून गेला.

त्यानंतर आरोपीने पीडितेला फोन करून एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ मित्रांना व नातलगांना शेअर करतो म्हणून तिला ब्लॅकमेल करू लागला. यामुळे घाबरलेल्या पीडितेकडून आरोपीने ऑनलाइन पद्धतीने ५४ हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण ६ लाख ५७ हजार ५०० रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी आज पुन्हा न्यायालयात
पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन नमूद आरोपीला अटक करून न्यायालयात उभे केले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. गुरुवारी पोलिस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयापुढे उभे केले जाणार असल्याचे तपास अधिकारी सपोनि शीतलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Extortion of six and a half lakhs by threatening to make the photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.