किल्लारी भूकंपाग्रस्तांना मदत करण्यात सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची कौतुकास्पद सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:09 PM2018-10-02T17:09:30+5:302018-10-02T17:15:38+5:30

३० सप्टेंबर १९९३ अत्यंत काळोखी रात्र; पण सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस!

Excellent service to the people of the medical sector of Solapur, to help the Kiliary earthquake victims | किल्लारी भूकंपाग्रस्तांना मदत करण्यात सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची कौतुकास्पद सेवा

किल्लारी भूकंपाग्रस्तांना मदत करण्यात सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची कौतुकास्पद सेवा

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवसएका दिवसात ४६० अ‍ॅडमिशन्स, त्यात २२९ पुरुष व २३१ स्त्रियादहा दिवसात जवळपास ७५० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या

३० सप्टेंबर १९९३ अत्यंत काळोखी रात्र; पण सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस! मी त्यावेळी डॉ.के.पी. डागांच्या अस्थिरोग विभागाच्या युनिट-२ चा रजिस्ट्रार म्हणून सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे आॅनड्युटी कामावर होतो. पहाटे ५ च्या सुमारास कॅज्युअल्टीमधून माझ्या हाऊसमनचा फोन आला व जाऊन बघतो तर सात-आठ लोक अपघातात जखमी झालेले व भांबावलेला जमाव होता. सुरुवातीला वाटले की रस्ते अपघात असेल; परंतु दर पाच-दहा मिनिटांनी ट्रक, बस, जीपमधून जखमींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले व नंतर कळले की हे सर्व लातूर-उस्मानाबादकडील भूकंपग्रस्त आहेत. त्वरित मी डॉ. डागांना बोलावून घेतले व त्यांनी सर्व विभागप्रमुख व पोलिसांशी संपर्क साधला.

आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचा कोणताही अनुभव किंवा प्लॅन उपलब्ध नव्हता. आहे त्या सामग्रीत सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, डीन, सिव्हिल सर्जन व इंटरनर्स धावून आले. अस्थिरोग विभागातील २० डॉक्टरांच्या दोन प्रमुख तुकड्यांबरोबर हे सर्वजण काम करीत होते. सुरुवातीला सगळेच भेदरलेले, कम्युनिकेशनचा अभाव व योग्य समन्वय नसल्याने अडचणी आल्या; परंतु संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व जखमी कोणतेही प्रथमोपचार न घेता मिळेल त्या वाहनाने पोहोचत होते. वैद्यकीय दल भूकंपग्रस्त भागात जाईपर्यंत जखमी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते व बाकी सर्व ठार झाले होते. एका दिवसात ४६० अ‍ॅडमिशन्स, त्यात २२९ पुरुष व २३१ स्त्रिया होत्या. अपघाताच्या तीव्रतेनुसार तीन वर्गात वर्गीकरण करून सुरुवातीला सिरिअस रुग्णांना उपचार दिले. यात २४ मयत झाले. सर्वात जास्त रुग्णांची संख्या ही अस्थिरुग्णांची होती. ५६ रुग्णांना डोक्याला मार लागला होता व २५ जणांना पोट व छातीत मार लागला होता. दुसºया दिवशीपर्यंत सर्वांचे एक्स-रे व प्रारंभिक तपासण्या करून आठ-आठ तासांच्या दोन शिफ्टमध्ये शस्त्रक्रिया चालू केल्या व पुढील दहा दिवसात जवळपास ७५० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

तिसºया दिवशीच मुंबईवरून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नंदू लाड यांची टीम मदतीला आली. त्यांना नुकत्याच मुंबईतील बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी होती; परंतु पहिल्याच दिवसात त्यांची खाण्या-राहण्याची मागणी व सहकार्य करण्याचा अभाव यामुळे त्यांना परत पाठवून द्यावे लागले. १५ दिवसांनी जर्मनीवरून डॉक्टरांचे पथक आले; परंतु तोपर्यंत सर्व शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडल्याचे पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यावेळी सोलापुरातील इतर हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटलच्या काही माजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी आवर्जून येऊन मदत केली. सुरुवातीला आम्ही अक्षरश: फार्मा, इम्पॉर्ट कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर मदत मिळविली. त्यात काही एनजीओ, दिव्यकांत गांधी यांनी रक्ताचा मोफत पुरवठा व डॉक्टरांसहित सर्वांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली.

नंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. सोलापुरात विमाने उतरू न शकल्याने कित्येक मदत परस्पर वळविली गेली. डॉक्टरांना व गरजूंना काही न मिळताच औषधे व वस्तूंचा भ्रष्टाचार झाला. सेलिब्रिटी व नेतेमंडळी फोटो सेशन्समध्ये व्यस्त होती. इतके अभूतपूर्व काम करूनसुद्धा तेव्हापासून आजपर्यंत कौतुक तर सोडाच साधे श्रेयाचे प्रशस्तीपत्रक दिले नाही. काही मंडळींनी येथून रिपोर्ट घेऊन स्वत:च्या नावावर झळकले. आम्ही आपले चार महिन्यांपर्यंत शेवटचा रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत मुकाटपणे व दर्जेदार काम करीत राहिलो. 

परवाचा इंडोनेशियातील भूकंप, त्या आधीचे भूज, पाकिस्तान, इराण, तुर्की वगैरेंची परिस्थिती पाहता मन विषन्न होते. २५ वर्षांत आम्ही मिळविलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अमूल्य अनुभवाचा कोणीही फायदा करून घेतला नाही. आजही सोलापूर व भारतात आपत्ती व्यवस्थापन कशाशी खातात  हे माहिती नाही. त्याचबरोबर पुनर्वसनसुद्धा व्यवस्थापनशून्य, उदासीन व भ्रष्टाचारामुळे डागाळलेले आहे. म्हणून तर आजही किल्लारीच्या जखमा अजून ताज्याच आहेत! पण ज्यांनी कुठलीच मदत व चांगले काम न करता स्वत:चीच पोळी भाजली ते कौतुकाचे गोडवे गाताना चित्र भूकंपापेक्षाही अगदी विदारक दिसत आहे.
केवळ आपत्ती व्यवस्थापन नसल्याने आजही भारत व इतरत्र असंख्य निष्पाप बळी जातात. सर्वांनी आपली माणुसकी जपली व स्वार्थ दूर ठेवला तरी खूप काही साध्य होईल. 
- डॉ. संदीप शं. आडके
(लेखक अस्थिरोग तज्ज्ञ आहेत)

Web Title: Excellent service to the people of the medical sector of Solapur, to help the Kiliary earthquake victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.