Emphasize tracing, testing, and treatment to reduce morbidity and mortality | रूग्णसंख्या अन् मृत्यूदर कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या

रूग्णसंख्या अन् मृत्यूदर कमी करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन विविध पातळीवर मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावेलग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

 जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

शिवशंकर यांनी शहरातील तर शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून २३ हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. ६५ कोविड केअर सेंटरमध्ये ८७१५ ची क्षमता असून २० डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०४६ तर ११ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०५८ रूग्णांची क्षमता आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणखी १२० बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.

थोरात म्हणाले की, कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील १०० दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासन विविध पातळीवर मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. बाहेर गावी जाणे, लग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा. दंड, लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही, प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. स्वनियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात साबणाने स्वच्छ धुण्यावर भर दिला तर रूग्णसंख्या आटोक्यात येणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.
 

Web Title: Emphasize tracing, testing, and treatment to reduce morbidity and mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.