सोलापूरातील ७६ महसुली मंडळात अतिवृष्टी; ६ तालुक्यातील ९२ गावांना पुराचा फटका, २७ गावातील वीजपुरवठा बंदच
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 29, 2025 17:28 IST2025-09-29T17:25:37+5:302025-09-29T17:28:10+5:30
पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सोलापूरातील ७६ महसुली मंडळात अतिवृष्टी; ६ तालुक्यातील ९२ गावांना पुराचा फटका, २७ गावातील वीजपुरवठा बंदच
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन ६ तालुक्यातील ९२ गावांतील शेती, घरदारे, जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ११० महसुली मंडळापैकी ७६ मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तसेच ९२ गावांना पुराचा फटका बसलेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे सीना, भीमा नदीला महापूर आल्याने जवळपासच्या शेकडो गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमिनी, घरे, मंदिरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे पिकेही नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सोलापूर-विजयपूर महामार्गावरील हत्तूर, वडकबाळ येथील पुलावरून पाणी पातळी वाढल्यामुळे जड वाहतुकीस सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीचे ९५ गावात जवळपास २५ कोटी चे नुकसान झालेले आहे. सध्या २७ गावातील वीजपुरवठा बंद असल्याची माहिती महावितरणने दिली.
सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूरस्थिती संदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाला पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी सूचना केल्या. पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय मदत प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवारा केंद्रातील लोकांना दोन वेळ जेवण तर जनावरांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करण्याचे निर्देशही जयकुमार गाेरे यांनी दिले.