आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:26 IST2025-04-28T14:26:19+5:302025-04-28T14:26:44+5:30
लहानपणी आईची जी माया हवी असते ती आम्हाला मिळाली नाही. हॉस्पिटलकडे जाण्याच्या ओढीने आम्हाला तिच्या मायेपासून पारखे व्हावे लागले.

आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
सोलापूर - माझ्या आईची प्रसूती २००५ साली डॉ. उमा मॅडमनं केली. त्यावेळी लहान भाऊ शिवमचा जन्म झाला. आईचा स्वभाव पाहूनच त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये कामावर घेतले. डॉक्टर अन् उमा मॅडम आईला मुलगी मानायचे. आईने हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले, तरी तिच्यावर ही वेळ आली. हॉस्पिटलला एवढे वाहून घेतले की आमचे बालपण बघायलाही तिला वेळ मिळाला नाही अशी कैफियत मनीषा माने यांची मुले शुभम आणि शिवम यांनी व्यक्त केली.
आईला अटक झाल्यापासून शेजारीही आमच्याशी बोलत नाहीत. काही मित्रांच्या मदतीने जेवणाचा डबा मिळतो. लहानपणी घरी भांडणे व्हायची म्हणून ड्युटीला जाताना आई आम्हाला मामाकडे ठेवून जायची अन् ड्युटीवरून परतल्यावर घरी येऊन यायची. ती घरी आल्यानंतर आम्ही झोपलेले असायचो आणि जायची तेव्हा आम्ही शाळेत. लहानपणी आईची जी माया हवी असते ती आम्हाला मिळाली नाही. हॉस्पिटलकडे जाण्याच्या ओढीने आम्हाला तिच्या मायेपासून पारखे व्हावे लागले. यात आईचा काही दोष नव्हता. ती सारे आमच्यासाठीच करत होती. असे असतानाही आमच्यावरच ही वेळ का? असा सवालही या दोघांनी विचारला आहे.
पोलिस आले की घाबरून जायचो...
आईला अटक केल्यानंतर दोन वेळा पोलिस घरी येऊन गेले. पहिल्या वेळेस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर आणि दुसऱ्या पोलिस कोठडीच्या वेळी. त्यांच्या येण्याने घाबरून जायचो. आजूबाजूचे लोकही आमच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. कुणी घराकडे फिरकत नाही. आम्ही काय गुन्हा केलाय, असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे असेही शुभम आणि शिवमने सांगितले.
कोरोनाकाळात मिळेल ते अन्न खाल्ले
कोरोना काळात आई दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये कामावर असायची. या काळात घरी स्वयंपाकही व्हायचा नाही. या वेळी लोकांनी मदत म्हणून दिलेले अन्न खाऊन आम्ही दिवस काढल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनीषाने पाठवलेल्या एका मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असे दिसून येत नाही. त्या मेलमध्ये तिने तिची व्यथा मांडली आहे. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असा युक्तिवाद करत मनीषा मानेचे वकील जामिनीसाठी कोर्टात अर्ज करणार आहेत.