सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:13 IST2025-09-24T10:12:55+5:302025-09-24T10:13:52+5:30
अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली, जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
आप्पासाहेब पाटील
सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने सीना व भीमा नदीला महापुराला आहे. या महापुरामुळे सहा तालुक्यातील १२९ गावांना पाण्याने वेढा घातला आहे.
दरम्यान, महापुराचे पाणी गावात शिकल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू असून शेतात पाणी शिरल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सकाळपासूनच करमाळा, माढा, मोहोळ तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करून आढावा घेत आहेत. अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली, जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका
सीना व भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वंदे भारत सिद्धेश्वर एक्सप्रेस सह अन्य रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.
दरम्यान, रेल्वे रुळावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विजापूरकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होटगी स्टेशनवर थांबविल्या आहेत, पुढे सिग्नल मिळत नसल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील तीन ते चार तास रेल्वे सेवा सुरू होण्यासंदर्भात अधिकृत काहीही सांगता येणार नाही असा निरोप रेल्वे विभागाकडून मिळत आहे. मुंबई, हैद्राबादहुन येणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आले आहेत.