Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:30 IST2025-07-20T17:27:49+5:302025-07-20T17:30:24+5:30
Madha Crime News: माढा तालुक्यातील अरण येथील १० वर्षीय कार्तिक गावीतील यात्रेत गेला होता. तो परत आलाच नाही. त्याचा शोध १५ जुलैपासून त्याचा शोध सुरू होता. कोरड्या कालव्यात त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
Madha Crime Latest News: बुधवारपासून अर्थात १५ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दहा वर्षीय कार्तिक खंडाळे (रा. अरण, ता. माढा) या मुलाचा मृतदेह शनिवारी सकाळी कोरड्या कालव्यामध्ये आढळून आला. या घटनेने माढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. कार्तिकचा चेहरा छिन्नविच्छिन्न केलेला आढळून आला, तर त्याचा मृतदेह कुजला होता. पोलिसांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक चाकू मिळाला, तर डांबरी रस्त्यावर रक्ताचे डागही आढळून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्या दिवशी कार्तिक बेपत्ता झाला, त्या दिवशी तो अरण येथे मैदानात खेळत होता. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजल्यापासून तो गायब होता. कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो यात्रेत जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला होता.
कार्तिकच्या शोधासाठी टेंभुर्णी पोलिसांनी पथके नेमली. ही पथकं चार दिवसांपासून विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होती.
चार दिवसानंतर सापडला मृतदेह
१९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता त्या मुलाचा मृतदेह तुळशी-मोडनिंब रस्त्यावर जाधववाडी जवळ शिवारात सीना-माढा उपसा सिंचनच्या कोरड्या कालव्यात आढळून आला.
त्या मुलाची अनोळखी ठिकाणी हत्या करुन मृतदेह कालव्यामध्ये आणून टाकल्याचे दिसत आहे. हत्या चार दिवसांपूर्वी झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती. घटना स्थळाजवळ डांबरी रस्त्यावर रक्त सांडलेले दिसून आले.
अरण येथील प्रमोद सरडे हे कामगारांना आणण्यासाठी सकाळी या भागात आले होते. लघुशंका करण्यासाठी ते कालव्याचा पट्टीजवळ आले असता त्यांना प्रथम दुर्गधी आली. त्यानंतर त्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
कार्तिकचा नरबळी ?
अरण येथील कार्तिक खंडाळे या दहा वर्षीय मुलाचा मृतदेह पाहून अरणमधील नागरिकांनी आणि कार्तिकच्या आई-वडिलांसह कॅनॉलकडे धाव घेतली. पायामध्ये बांधलेला काळा गोप, अंगावर असणारे कपडे त्यांनी तत्काळ ओळखले.
हा माझाच कार्तिक आहे म्हणून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेने अरणवर शोककळा पसरली असून, आपली मुलं बाहेर सोडायला सर्वसामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान गावात कार्तिकचा नरबळी गेल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, पोलिसांच्या गाड्या आल्या. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सोलापूर येथील श्वान पथकास पाचारण केले. मात्र, त्यानेही प्रेतापासून एक किलोमीटरपर्यंत पूर्वेकडे माग दाखवून ते परत माघारी फिरले. यावेळी पोलिसांना एक सुरा सापडला.
पोलिसांची जादा कुमक मागवली
बघ्यांनी गर्दी केल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता. तणावग्रस्त स्थिती निर्माण झाल्याने जादा पोलीस तुकड्या मागवण्यात आल्या. चौथीमध्ये शिकणा-या कार्तिकची हत्या का केली गेली याचा तपास करण्याचे आव्हान टेंभुर्णी पोलिसांपुढे आहे.
श्वानासह फॉरेन्सिक पथकाला बोलावले
पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळी श्वान मोडनिंब दिशेले भटकले. तसेच रक्त लागलेला दगड पोलिसांनी जप्त केला. डांबरी रस्त्यावर रक्त सांडलेले दिसून आले.
दुपारी १२ पर्यंत तपासाने वेग घेतला. सकाळी ११.३० वाजता फॉरेन्सिक टीमही दाखल झाली. या टीमने मृतदेह ताब्यात घेऊन सोलापूर येथे उत्तरिया तपासणीसाठी दुपारी २ वाजता नेण्यात आला.