सोलापुरातील 212 जणांची कोरोना चाचणी; 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह
By Appasaheb.patil | Updated: April 10, 2020 21:48 IST2020-04-10T21:44:25+5:302020-04-10T21:48:08+5:30
दिलासादायक; सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही

सोलापुरातील 212 जणांची कोरोना चाचणी; 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह
सोलापूर : सोलापुरात आज सायंकाळपर्यंत उपलब्ध झालेल्या अहवालानुसार एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूरमध्ये आत्तापर्यंत 212 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बाकीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
दक्षिण सोलापुरातील वांगी परिसरातून काम करणारा मजूर ग्वाल्हेर येथे गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर या परिसरातील सर्व गावांची काल आणि आज पुन्हा तपासणी करण्यात आली आहे.
जवळपास 3 हजार 60 लोकांची तपासणी झाली. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
काल जवळपास 56 जणांची या भागात कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते 46 जणांचे अहवाल उद्या सकाळपर्यंत प्राप्त होतील अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
दिल्लीतील मरकज येथील कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या आणि त्यांच्याशी संबंधित 53 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल पूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. यातील 22 जणांची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती. त्यांचेही अहवालही निगेटिव्ह आले आहेत अशी माहितीही शंभरकर यांनी दिली आहे.