विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट; वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:47 IST2025-10-19T09:47:03+5:302025-10-19T09:47:17+5:30
धक्कादायक प्रकारानंतर बीव्हीजी कंपनीला मंदिर समितीची नोटीस

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट; वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या
पंढरपूर : दीपावली सण हा उत्साहाचा, आनंदाचा आहे. हिंदू सणातील हा महत्त्वाचा सण आहे. या सणानिमित्त अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र पंढरपुरात सुरक्षा रक्षकाचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीने दीपावली सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट दिला आहे. या प्रकरणी समितीने बीव्हीजीला नोटीस बजावली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देवाच्या दर्शनाला राज्यभरातून लोक येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी शासनाकडून यात्रा काळात शहरातील मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात येतात. तसेच विठ्ठल मंदिरात काम करणारे देखील कर्मचारी मोठ्या सेवाभावी वृत्तीने काम करतात. मात्र मंदिर समिती सुरक्षा रक्षकाचा ठेका घेतल्यापासून वादात असलेल्या बीव्हीजी कंपनीकडून सतत विठ्ठल भक्तांच्या भावना दुखाविण्याचे काम होत आहे. भाविकांना शिवीगाळ, मारहाण, त्याचबरोबर तीर्थ म्हणून चंद्रभागा नदीच्या पाण्याची विक्री असे प्रकार बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घडले आहे.
यामुळे या कंपनीविरोधात अनेकवेळा आंदोलने झाली. त्याचबरोबर मंदिर समितीकडून त्यांना सतत नोटीस देण्यात आली आहे, असे असतानाही माळकरी वारकऱ्यांचा देव असलेल्या व त्या देवाची सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीने दिवाळीची भेट म्हणून चिकन मसाला दिला आहे. यामुळे बीव्हीजी कंपनीविरुद्ध शहरातील नागरिक, महाराज मंडळी, वारकऱ्यांमधून करत नाराजी व्यक्त होत आहे.
बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून यापूर्वी वारकऱ्यांवर अनेकदा अन्याय झाला आहे. त्याचबरोबर मागील तीन ते सहा दिवसांपूर्वी एका महिला भाविकाला कर्मचाऱ्यांनी ढकलून दिले होते. ती महिला रक्तबंबाळ झाली होती. अशा कंपनीचा ठेका रद्द झाला पाहिजे - सुमित शिंदे, नागरिक
एखादी पवित्र भूमी असलेल्या मंदिराच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या संस्थेचा ठेका रद्द केला पाहिजे. पंढरपूर शहर व मंदिराच्या स्वच्छतेची व सेवेची जबाबदारी मोफत द्यायला वारकरी साहित्य परिषद तयार आहे - विठ्ठल पाटील, अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद
बीव्हीजी कंपनीकडून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. त्यामध्ये त्यांच्या कंपनीचे विविध प्रकारचे मसाले आहेत. त्यात चिकन मसालादेखील आहे. ही बाब अत्यंत चुकीची आहे. यामुळे बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती