लग्नासाठी मुलाने केली चक्क आईला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 19:29 IST2019-08-28T19:27:52+5:302019-08-28T19:29:35+5:30
सोलापुरातील घटना; सदर बझार पोलीस ठाण्यात मुलाविरूध्द गुन्हा दाखल

लग्नासाठी मुलाने केली चक्क आईला मारहाण
सोलापूर : लग्न का लावून देत नाही, असा जाब विचारत आईला मारहाण केल्याप्रकरणी मद्यपी मुलाविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अविनाश विद्याधर धावड (वय २८, रा. औदुर, जि. उस्मानाबाद सध्या विकासनगरजवळ, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. सरस्वती विद्याधर धावड (वय ५५) या पती व मुलगा अविनाश यांच्यासोबत राहतात. अविनाश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. सरस्वती धावड या दीर प्रमोद यांच्या घरी असताना अविनाश याने आजोबा प्रभाकर यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात अविनाश याच्याविरूद्ध तक्रार देण्यात आली होती. त्याच रात्री संध्याकाळी ८ वाजता घरात सर्वजण जेवण करण्यासाठी बसले होते. अविनाश याला जेवणाचे ताट दिले असता त्याने ते फेकून दिले. माझे लग्न कधी करणार असे विचारले तेव्हा आई सरस्वती यांनी तू काही कमवत नाही, तुला दारू पिण्याची सवय आहे, तुला मुलगी कोण देणार असे म्हणताच अविनाश याने शिवीगाळ करीत स्टीलचा तांब्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.