भाजप हा लोकशाही बुडव्या पक्ष; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:04 IST2026-01-12T15:04:18+5:302026-01-12T15:04:38+5:30
महाराष्ट्राला वाचविण्यासाठी आता सभ्यतेची गरज असल्याचे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले...

भाजप हा लोकशाही बुडव्या पक्ष; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिका
आप्पासाहेब पाटील -
सोलापूर : व्हाेट चोरी, दमबाजी, विरोधकांतील उमेदवारांना, नेत्यांना धमकाविणे, खून करणे, बोगस मतदान, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, बलात्कारी, अवैध धंदे, ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना उमेदवारी देणे अशा एक ना अनेक घटनांमुळे भाजपाने निवडणुकीच्या काळात नैतिकता गमाविली आहे. भाजप हा लोकशाही बुडव्या पक्ष आहे. संविधान पायदळी तुडविणारा पक्ष आहे. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी आता सभ्यतेची गरज असल्याचे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सोमवारी सोलापूर दौरा होता. दौर्याच्या निमित्ताने आलेल्या सपकाळ यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीचे पैसे वाटणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना निवडणूक आयोग गप्प का असा सवाल केला. भय अन् प्रलोभनातून निवडणुका होत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत, मागील निवडणूकामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना २१०० रूपये देण्यासाठी पैसे नाहीत नसताना शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आले कोठून ? असाही सवाल उपस्थित करीत समृध्दीमहामार्गात २ हजार कोटी रूपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचेही त्यांनी आरोप केला.
सुजात आंबेडकरांचे वक्तव्य चुकीचे...
वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी काही दिवसापूर्वी खा. प्रणिती शिंदे या भाजपाचे काम करतात, त्या लवकरच भाजपात जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविषयी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुजात आंबेडकरांचे ते वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी असे वक्तव्य यापुढे करू नये असे म्हणाले.