दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा; शरद पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 14:55 IST2020-09-29T14:36:38+5:302020-09-29T14:55:03+5:30
शरद पवार पंढरपूर दौ-यावर; कृषी विधेयकाला शरद पवारांचा विरोधच

दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा; शरद पवारांचा टोला
पंढरपूर : खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़ शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपकआबा साळुंखे उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले, खा. रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही. खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळविण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
कृषी विधेयक येण्यापूवीर्ही शेतक-यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे, मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.