मोठी बातमी; सोलापुरातील महापुराची व्याप्ती वाढणार; पुणे, सांगली, कोल्हापूरकडे मागितली मदत
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 27, 2025 18:43 IST2025-09-27T18:42:59+5:302025-09-27T18:43:25+5:30
सध्या सोलापुरात एनडीआरएफ व लष्कराच्या हेलिकॉप्टर द्वारे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बचाव करण्याचे काम सुरू आहे.

मोठी बातमी; सोलापुरातील महापुराची व्याप्ती वाढणार; पुणे, सांगली, कोल्हापूरकडे मागितली मदत
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पडत असलेला पाऊस व उजनी व सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला विसर्गामुळे सीना व भीमा नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कोल्हापूर, सांगली, पुणे व अन्य शहराकडे मदत मागितली आहे.
दरम्यान, सध्या सोलापुरात एनडीआरएफ व लष्कराच्या हेलिकॉप्टर द्वारे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बचाव करण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत १२९ गावातील ४ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, या पावसामुळे महापुराची व्याप्ती वाढण्याचे संकेत गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत.
भीमा नदीकाठच्या लोकांना इशारा...
उजनीतून एक लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. सप्टेंबर महिन्यात सहा तालुक्यात दोनशे टक्के पेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.