Solapur: सोलापुरातील चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार; मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक
By आप्पासाहेब पाटील | Updated: October 17, 2025 16:21 IST2025-10-17T16:21:01+5:302025-10-17T16:21:30+5:30
Solapur News: आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर भाजपाकडून वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे सेना, कॉंग्रेस पक्षातील नेते आता भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

Solapur: सोलापुरातील चार माजी आमदार भाजपात प्रवेश करणार; मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर भाजपाकडून वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे सेना, कॉंग्रेस पक्षातील नेते आता भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असून माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हेही भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गाेरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र काेठे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, विक्रम शिंदे, भाजपच्या शहराध्यक्ष राेहिणी तडवळकर आदी उपस्थित हाेते. गुरूवारी शहरातील साेलापूर महापालिकेचे माजी उपमहापाैर नाना काळे, दिलीप काेल्हे, सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी ताेडकरी, मारुती ताेडकरी, कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भाेसले आदींनी भाजपात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून आणखीन कोण कोण भाजपात प्रवेश करणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.