Beti Bachao-Beti Padhao Abhiyan; Solapur 'Lokmat' hundreds of doctors-citizens on the road! | बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान; सोलापूर ‘लोकमत’संगे शेकडो डॉक्टर्स-नागरिक रस्त्यावर ! 

बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान; सोलापूर ‘लोकमत’संगे शेकडो डॉक्टर्स-नागरिक रस्त्यावर ! 

ठळक मुद्देमानवी साखळी निर्माण करून मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. ‘मुलांना माणूस म्हणून वाढवा- वेलणकर

सोलापूर: समाजात मुलगा-मुलगी या लिंगभेदाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकमत सखी मंच व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी २ जानेवारीला सेवासदन प्रशालेत (वॉक फॉर कॉझ) ‘बेटी बचाओ, बेटी  पढाओ’ जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या जनजागरणासाठी शेकडो डॉक्सर्स आणि नागरिकांनी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

व्यासपीठावर महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधुरी दबडे, सचिव डॉ. प्रतिभा बलदवा, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, सेवासदन संस्थेचे सहसचिव केदार केसकर यांची उपस्थिती होती.

उपस्थित शेकडो विद्यार्थ्यानींना संबोधित करताना मधुरा वेलणकर यांनी पालकांना लिंगभेद करण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही कानमंत्रही दिले. प्रास्ताविकेतून डॉ. माधुरी दबडे यांनी जनजागृती रॅलीचा उद्देश विशद केला. महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वत:ला मुली असल्याचा अभिमान व्यक्त केला. लिंगभेदाची ही भावना जनतेने दूर करून समानतेची भावना समाजात रुजायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सेवासदन शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या वंदना जोशी, मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर, नीता बोळकवठेकर, रोटरी क्लब इलाईटचे अध्यक्ष राजन वोरा, लायन्स क्लब आॅफ मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, रोटरी क्लब आॅफ नॉर्थच्या अध्यक्षा वंदना कोपकर, अपूर्व महिला मंडळ, स्त्री सखी मंडळ, अश्विनी हॉस्पिटल नर्सिंग कॉलेज, इनरव्हील क्लब, दमाणी प्रशाला, प्रीती केटरर्स आदींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. गौरी कहाते यांनी केले. 

‘मुलांना माणूस म्हणून वाढवा- वेलणकर
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा मुलगी म्हणजे प्रकाश देणारी पणती, असे पारंपरिक शब्द वापरून लिंगभेद न करता आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून वाढवलं तर नक्कीच त्यांचं जीवन प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना उपस्थित विद्यार्थिनींना उद्देशून त्यांनी ‘आपण खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही या ठिकाणी अस्तित्वात आहात, म्हणून समोर बसलेल्या मुलींनो जीवन खूप सुंदर आहे, त्याचा खºया अर्थानं आस्वाद घ्या अन् आपल्या स्वप्नांना नवे पंख देऊन प्रगती साधावी, असे आवाहन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती
- यावेळी सेवासदन प्रशालेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी लिंगभेदावर आधारित लघुनाटिका सादर केली. या बालचमूंनी आपल्या अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवत प्रबोधनाचा संदेश दिला. यावेळी मुलींना समान हक्क देण्याविषयीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.

शहरे स्मार्ट झाली, मुलींनो स्मार्ट व्हा!
- महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे भाषणात म्हणाले की, समाजात मुलींचं योगदान मोलाचं आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. शहरे स्मार्ट होताहेत, मुलींनो आपणही आता स्मार्ट व्हायला पाहिजे. लोकमत आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींच्या पुढाकारातून घेण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल. 

सेल्फी पॉर्इंटवर महिला वर्गाची गर्दी
- या उपक्रमांतर्गत शहरातील लोकांना आपल्या मुलींसमवेतचा फोटो पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील काही  निवडक सेल्फींचा कार्यक्रम स्थळी असलेल्या प्रदर्शनात समावेश करण्यात आला. त्यावेळी आपली सेल्फी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

‘वॉक फॉर कॉज’ रॅलीने वेधले लक्ष
- मुख्य कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सकाळी ९ वाजता लक्षवेधी रॅली काढण्यात आली. सेवासदन प्रशालेपासून सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासह महिला मंडळांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही रॅली सेवासदन प्रशालेपासून सरस्वती चौक, लकी चौक, किल्ला बागमार्गे चार हुतात्मा पुतळ्याजवळ विसर्जन झाले. तत्पूर्वी चार हुतात्म्यांना आणि अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवी साखळी निर्माण करून मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. 

Web Title: Beti Bachao-Beti Padhao Abhiyan; Solapur 'Lokmat' hundreds of doctors-citizens on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.