पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 07:46 IST2026-01-11T07:45:44+5:302026-01-11T07:46:03+5:30
वाहकाने मुलाचे न ऐकता बसचा दरवाजा उघडून त्याला थेट महामार्गावर उतरवले.

पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
मल्लिकार्जुन देशमुखे
'काका, पास घरी राहिला आहे... माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील...', अशी कळकळीची विनंती करत असलेल्या सातवीतील चिमुकल्याला एसटी बसमधून थेट महामार्गावर उतरविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगळवेढा तालुक्यात घडली. या प्रकारामुळे पालक, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला ये-जा करतो. शनिवारी सायंकाळी पाच वाजता तो सोलापूर-मंगळवेढा या एसटीने प्रवास करत होता. वाहक तिकीट काढण्यासाठी आला. त्यावेळी प्रथमेशला पास घरी राहिल्याचे लक्षात आले. त्याने वडिलांना फोन करण्याची विनंती केली. मात्र, वाहकाने त्याचे न ऐकता बसचा दरवाजा उघडून त्याला थेट महामार्गावर उतरवले.
डोळ्यांत पाणी अन् मनात भीती
अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला धावणारी वाहने... अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हात दाखवला. त्या व्यक्तीच्या मदतीने तो घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून कुटुंबीय हादरून गेले. पालक राहुल पाटील यांनी संबंधित वाहकावर निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे.
झाल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास संबंधितावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल- संजय भोसले, आगार व्यवस्थापक, मंगळवेढा