कोल्हापूरची अमृता पुजारी महिला डबल महाराष्ट्र केसरी!, चांदीची गदा, कार पटकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:17 IST2026-03-31T18:17:01+5:302026-03-31T18:17:18+5:30
उपविजेती वेदिका सासने बुलेटची मानकरी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला डबल महाराष्ट्र केसरी!, चांदीची गदा, कार पटकावली
सोलापूर : सोलापुरात रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने कोल्हापूरच्याच वेदिका सासनेला अस्मान दाखवत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळविला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासने यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटांत एकेरी पट काढत दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा एकेरी पट काढून दोन गुण मिळवून पहिल्या सत्रात ५-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने संरक्षण करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत ‘महाराष्ट्र केसरी’चा मान मिळविला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली.
अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासोा लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल, हिंदकेसरी योगेश दोडके, आयोजक स्वाती अळळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेनजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, रमेश बारसकर, सागर कल्याणशेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळळीमोरे, योगेश बोंबाळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरवदे, यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे युवराज केचे यांनी सूत्रसंचालन केले.
महिला कुस्ती स्पर्धेसाठी ५० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार : गोरे
पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन एक कोटी रुपयांचा निधी देते. परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात सांगितले.